लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार यांचे पहिल्यादांच काटेवाडी गावात आगमन झाले. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जोरदार यशामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आनंदित होते. जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीने शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले. शरद पवार यांच्या सोबतीला आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि बारामतीतून विधानसभेची तयारी करणारे युगेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी जनसंवाद मेळाव्यातून शरद पवार यांनी गावकऱ्यांना संबोधित केले.
बारामतीच्या निवडणुकीत मोदींनी लक्ष घातल्याचा आपल्याला फायदा झाला!
आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीचा नारळ मी काटेवाडीतून फोडलाय. आतापर्यंत माझा एकाही निवडणुकीत पराभव झालेला नाही. सतत ५६ वर्षे निवडून येणारा माझ्याशिवाय सध्या एकही लोकप्रतिनिधी देशात नाही. सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठी करायचा असतो, ही शिकवण आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी दिली. बारामतीच्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले. त्याचा फायदा आपल्याला अधिक झाला. माझे तर म्हणणे आहे, की बारामतीत मोदींनी अधिक लक्ष घालावे म्हणून आपल्याा फायदा होत राहिल, असा टोला पवार यांनी मोदींना लगावला.
बारामतीच्या निवडणुकीत देणंघेणं झालं असं म्हणतात, खरंय काय?
दुसरीकडे बारामती लोकसभेच्या निवडणुकीत पैशांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला, अशी चर्चा मी ऐकली आहे, असे म्हणत सभेला उपस्थित नागरिकांनाच त्यांनी मी ऐकलं ते खरे आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर समोरूनही होय पैशाचा खूप वापर झाला, असे उत्तर मिळाले. त्यांच्याकडे गेलेले आपलेच असते, त्यामुळे तो भाग सोडून द्या, अशी टोलेबाजी करून शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.