सरकार करणार ३ हजार कोटी खर्च
या योजनेअंतर्गत सरकार विमा कंपनीला प्रत्येक कुटुंबासाठी १३०० रुपये प्रीमियम भरणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून तीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत आणखी ९०० रुग्णालयं नव्याने जोडली जाणार असून एकूण १९०० रुग्णालयं आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार देतील. मुंबईत ५७ रुग्णालयांमध्ये MJPJAY योजनेद्वारे उपचार केले जाणार आहेत.
महाराष्ट्रातील जनतेला उत्तम आरोग्यसह चांगल्या सुविधा, तसंच आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी सरकारचं विमा योजना सुरू करण्याचं उदिष्ट्य आहे. मागील वर्षी जूनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमा रक्कम दीड लाखांवरुन ५ लाख रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांनीही ५ लाखांचा विमा लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्याची जवळपास वर्ष होत आलं तरीही अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी सरकारकडून युनायटेड इंडिया ॲश्युरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. सध्या दीड लाखांचा विमा ३० जूनपर्यंत असणार आहे. तर १ जुलैपासून ५ लाखांचा विमा लागू करण्यात येणार आहे. MJPJAY योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीकडे डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. या दोनपैकी एक कागदपत्र असणं आवश्यक आहे, अन्यथा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
योजनेअंतर्गत १९०० रुग्णालयं, १३५६ आजारांवर उपचार
सध्या या योजनेअंतर्गत १००० रुग्णालयं आहेत. मात्र आता जुलैपासून आणखी ९०० रुग्णालयं जोडली जाणार आहेत. त्यापैकी मुंबईत ५७ रुग्णालयांमध्ये उपचार केले जाणार आहेत. तसंच या विमा योजनेत १३५६ आजार कव्हर होणार आहेत. मूत्रपिंड, यकृत, हृदय आणि इतर अनेक आजारांवर उपचार केले जातील.
कसे उपचार घेता येतील?
कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्वात आधी MJPJAY ही विमा योजना असलेल्या रुग्णालयात जावं लागेल. रुग्णालयांसंबधित माहिती https://www.jeevandayee.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या साइटवर नेटवर्क हॉस्पिटल या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर जिल्ह्याची निवड केल्यानंतर रुग्णालयांची संपूर्ण यादी इथे मिळेल.
एखाद्या रुग्णाला डॉक्टरांनी एंजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला असेल, तर डॉक्टर एक फॉर्म आणि पत्र लिहून देतील. तो फॉर्म आणि पत्र रुग्णालयातील ‘रुग्ण मित्र’ इथे द्यावा लागेल. MJPJAY ने रुग्णालयांमध्ये एक कक्ष स्थापन केला असून तिथे ‘रुग्ण मित्र’ रुग्णाचं रजिस्ट्रेशन करतो. तिथेच रुग्णाला रेशन कार्ड किंवा डोमिसाइलची झेरॉक्स द्यावी लागते. त्याशिवाय डॉक्टरकडून लिहून दिलेलं पत्र जोडावं लागतं.
रुग्ण मित्राकडून सर्व कागदपत्र ऑनलाइन अपलोड केल्यानंतर MJPJAY कार्यालयात असलेली डॉक्टरांची समिती रुग्णाने डॉक्टरद्वारे भरलेले फॉर्मची छाननी होते. रुग्णाला खरोखरच उपचाराची गरज आहे, असं समितीला वाटल्यास अवघ्या काही तासांत अर्ज स्वीकारून लाभांतर्गत उपचारासाठी मान्यता दिली जाते.