अकरा जुलैपर्यंत नियोजन
सातही उपायुक्तांना नेमून दिलेल्या दिवशी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष आणि नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तसा आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला असून, सध्या ११ जुलैपर्यंतच्या जबाबदाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
उपायुक्तांची आवश्यकता का?
पावसाळ्यादरम्यान काही वेळा अतिवृष्टी होते. कमी वेळेत अधिक पाऊस झाल्यास रस्ते जलमय होतात आणि तुंबतात. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरते, काही ठिकाणी इमारतीच्या पार्किंगमध्येही पाणी शिरते. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडतात. अशा वेळी महापालिकेचे सांडपाणी व्यवस्थापन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पथ विभाग, उद्यान विभाग, क्षेत्रीय कार्यालये आदी विभागांसह अग्निशामक दल मदत कार्यात सक्रिय होते. मात्र, या कामात योग्य समन्वय साधण्यासाठी उपायुक्तांची मदत होणार आहे.
रात्रीची उपस्थिती गरजेची
महापालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षात नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात. त्यानुसार, नियंत्रण कक्षाकडून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना माहिती देऊन मदत यंत्रणा कार्यान्वित केली जाते. काही वेळा जिल्हाधिकारी कार्यालय, जलसंपदा, ‘महावितरण’ आणि अन्य सरकारी यंत्रणांशीही समन्वय ठेवून काम करावे लागते. त्यासाठी महापालिका भवनाच्या पाचव्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या आपत्ती निवारणाच्या मुख्य कक्षात वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणे आवश्यक आहे. विशेषतः अनेकदा रात्री जोरदार पाऊस होतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी आपत्ती निवारण कक्षात या अधिकाऱ्यांची उपस्थिती महत्त्वाची ठरते.
वारनिहाय जबाबदारी
सोमवार – राजू नंदकर
मंगळवार – माधव जगताप
बुधवार – संदीप कदम
गुरुवार – नितीन उदास
शुक्रवार – युनूस पठाण
शनिवार – राहुल जगताप
रविवार – विजय लांडगे
उपायुक्तांकडून अपेक्षित कामे
– आपत्ती व्यवस्थापन कक्ष, क्षेत्रीय कार्यालयाच्या कामाकाजावर नियंत्रण.
– नियंत्रण कक्षाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे.
– नागरिकांच्या कॉल्सची नोंदणी, निरसन आणि नोंदवहीचे जतन.
– जिल्हाधिकारी कार्यालय, जलसंपदा, हवामान विभाग, पोलिस यांच्याशी समन्वय.
– गरजेनुसार राज्य व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाशी संपर्क व समन्वय.
– महत्त्वाच्या घटनांसंदर्भात आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांशी तत्काळ संपर्क.