अश्लील चाळे करण्यापासून रोखल्याचा राग, भामचंद्र डोंगरावर वारकरी विद्यार्थ्यांना टोळक्याकडून मारहाण

प्रशांत श्रीमंदीलकर, खेड, पुणे : तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर (ता. खेड) वारकरी पंथाचा अभ्यास करणाऱ्या साधक वारकरी विद्यार्थ्यांना तरुणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारकरी विद्यार्थ्यांनी या डोंगरावर आलेल्या मुलं आणि मुलींना अश्लील चाळे करण्यापासून हटकल्याने ही मारहाण करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

वारकरी विद्यार्थ्याला मारहाण

याबाबत अधिक माहिती अशी की, वासुली परिसरात असणाऱ्या भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून साधक या ठिकाणी वर्षानुवर्षे राहून अभ्यास करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आजही जवळपास ३० ते ४० विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येथे आहेत. मात्र रविवारी एक तरुण मुलगा आणि मुलगी या ठिकाणी आले होते. त्या दोघांचे अश्लील चाळे सुरू होते. त्यामुळे तिथे अभ्यास करण्यासाठी आलेल्या कुलदीप शिवगोंडा खोत या वारकरी विद्यार्थ्यांने त्यांना हटकलं.
Pune News : महिलेच्या अंगावर भरधाव कार घालण्याचा प्रयत्न, काळजाचा ठोका चुकविणारा पुण्यातील VIDEO
त्यानंतर त्या मुलाने अभ्यास करणाऱ्या साधकाला शिवीगाळ करत मारहाण केली. तो तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने संध्याकाळी पुन्हा मित्रांना बोलावून साधकाला अधिक मारहाण केली. या घटनेत साधक विद्यार्थ्यांचा पाय मोडला असून त्याच्या सोबतच्या एका विद्यार्थ्यांलादेखील मारहाणीत टोळक्याने जखमी केलं आहे. या साधकावर एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेचा भामचंद्र डोंगर सप्ताह समितीने निषेध केला आहे. या तरुणांच्या टोळक्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मारहाण झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक

भामचंद्र डोंगर येथे नेहमी तळीराम आणि प्रेमी युगुल वावरत असतात. त्यांच्याकडून यापूर्वी देखील अनेक साधकांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. परंतु आता मारहाण झाल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. इथे अभ्यास करणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. याप्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश नवले करत आहेत.
Pune News : टेम्पोमध्ये दाटीवाटीने ७४ म्हशी, पोलिसांना कुणकुण; छापा टाकताच… पुण्यात मोठी कारवाई

याबाबत मटा ऑनलाइनशी बोलताना हभप शंकर महाराज मराठे म्हणाले की, या ठिकाणी असे घडणारे प्रकार चुकीचे आहेत. पूर्वी असे प्रकार घडत नव्हते. या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा स्थानिक लोकांनी मिळून नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.