सुनेत्रा पवार यांचा पराभव हा अजित पवारांच्या अत्यंत जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राज्यसभा देऊन बारामतीकरांच्या पुन्हा एकदा विश्वास निर्माण केला जाणार आहे. परंतु आता अवघ्या तीन चार महिन्यांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक ही अजित पवारांसाठी फक्त एक निवडणूक नसून त्यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे.आणि पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
अजित पवारांची रणनीती कशी असणार ?
बारामती लोकसभेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर गुरुवारी (ता. 06 जून) पहिल्यांदाच त्यांनी याबाबत स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली. हा जनतेने दिलेला कौल आहे. जनतेचा विश्वास संपादित करण्यास मी कमी पडलो हे मान्य करावे लागले, असे म्हणत अजित पवार यांनी बारामती लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली. तर, बारामती लोकसभेच्या निकालाने आश्चर्य वाटले असून बारामतीकरांनी इतक्या वर्षात त्यांच्यासाठी काम करूनही मला का नाकारले, हे बारामतीकरांशी चर्चा करून जाणून घेईल, असे म्हणत अजित पवारांनी आपले मत व्यक्त केले होते.
तर दुसरीकडे अजित पवार यांनी जे बंड केलं ते बारामतीच्या जनतेला आवडलं नाही म्हणून त्यांचा लोकसभेत पराभव झाला असं बोललं जात आहे. त्यामुळे बारामतीकरांचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जाणार आहे.
विधानसभेत अजित पवारांना कोण शह देणार ?
4 जूनला बारामतीचा निकाल लागला अन् शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. तेव्हा कार्यकर्त्यांनी एकच मागणी केली ती म्हणजे बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवार यांना तिकिट द्या. बारामतीचा दादा बदलण्यासाठी युगेंद्र पवार यांना तिकिट देण्याची मागणी वाढते आहे. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. त्यामुळे आता अजित पवारांना त्यांचा पुतण्याच त्यांना टक्कर देणार असल्याची चर्चा आहे.
युगेंद्र पवार यांची पार्श्वभूमी काय ?
अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा म्हणजे युगेंद्र पवार. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत. शरयू ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार हे त्यांच्या व्यवसायात सक्रिय आहेत. फलटण तालुक्यातील शरयू साखर कारखान्याचं कामकाज युगेंद्र पवार पाहतात. लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार केला होता. आता याच युगेंद्र पवार यांना तिकिट देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
युगेंद्र पवार यांना जर तिकीट देण्यात आलं तर शरद पवार हे पुन्हा एकदा निवडणूक हाती घेणार यात कोणतीही शंका नाही, त्यामुळे अजित पवार हे आव्हान कसे पेलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.