‘अमित शाह यांचं नाव नका घेऊ, नाहीतर…’, नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना थेट इशारा, राऊतांवरही हल्लाबोल

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे, चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आता भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना थेट इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाले राणे? 

कोकणात पाऊस पडतो तसाच समुद्राला मिळतो. अर्ध्या तासात जातो. मुंबईत पाऊस पडतो, जुलै ऑगस्टला अधिक पाऊस पडतो. सरकारला मदत करायची सोडून हे टीका करतात. एकनाथ शिंदेंना नावं ठेवता. तुम्हाला नावं ठेवली तर? आदित्य ठाकरे यांना धड मराठी बोलता येत नाही. तोतरा बोलतो. आम्ही नक्कल केली तर काय होईल?  उद्धव ठाकरेंची नक्कल केली तर काय होईल? आरशात  तुमचे चेहरे बघा चेहरे, असा हल्लाबोल यावेळी नारायण राणे यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट इशारा देखील दिला आहे. अमित शाह यांचं नाव घेऊ नका. अडचणीत येताल. संजय राऊतांच्या नादाला लागू नका, ते काय महात्मा आहेत का? भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले होते, पुस्तक काढलं, जणू काही मोठ्या संग्रामात जाऊन आले, त्यांचं काय कौतुक? राऊत जेलमध्ये का गेले ते पाटणकर बाईंना विचारा, असं यावेळी नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे, भ्रष्टाचाराबाबत उद्धव ठाकरे यांनी बोलू नये. डिनो मोरियाच्या कितीतरी कंपन्या आहेत. केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहेत. डिनो मोरियाचे कदमशी काय संबंध आहेत. माझ्याकडे १९८५ पासूनचे हिशोब आहेत. शिंदे गप्प बसतात बिचारे,  एकनाथ शिंदेंनी पोतं काढावं, मातोश्रीपर्यंत पोहोचवलेलं. आवाज बंद होईल उद्धव ठाकरेंचा आणि  आदित्य ठाकरे यांचाही. एकनाथ शिंदे निष्ठावान होते म्हणून ते काम करत होते. उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये. परदेशातील गुंतवणुकीची माझ्याकडे माहिती येत आहे. इथे नाही बाहेर गुंतवणूक आहे, कोणत्या कंपनीचा नफा तिकडे पाठवला? कोरोनात सर्व पेपर लॉसमध्ये फक्त सामाना सोडून? अस कसं काय? असा सवालही यावेळी नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)