हे अतिशय गंभीर… शिरसाट यांच्या मुलावरील आरोपांवर अंजली दमानिया काय म्हणाल्या?

Siddhant Shirsat : मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेने गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मला लग्नासाठी धमकावण्यात आले तसेच माझा शारीरिक मानसिक छळ करण्यात आला, असं या विवाहितेने म्हटलंय. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महिलेच्या या आरोपांवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दमानिया काय म्हणाल्या?

मला हे प्रकरण ऐकून अतिशय धक्का बसला आहे. बेशिस्तपणा सोडा, अरेरावी, लूट सोडा पण आता कौटुंबिक छळ केला जातोय. एक नाहीतर अनेक उदाहरणं बाहेर येत आहेत, हे पाहून धक्का बसत आहे. माझे वडील मंत्री होणार आहेत, म्हणून मी तुला तिथे घेऊन जाऊ शकत नाही, असे सांगितले जात आहे. हे अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे, असं मत दमानिया यांनी व्यक्त केलं.

संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण द्यावं

तसेच, मला वाटत होतं की त्या मुलीनेच हे प्रकरण उचलावं. पण आता संजय शिरसाट यांनीच पत्रकार परिषद घेऊन सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजेत, अशी भूमिका दमानिया यांनी घेतली. या मुलीचा जो छळ झाला याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं. तसेच त्या महिलेला न्याय देण्यासाठी ते काय करणार आहेत? याबाबतही त्यांनी सांगायला हवं, असंही दमानिया यांनी म्हटलंय.

शिरसाट यांच्या मुलावर नेमके आरोप काय?

एका विवाहिताने संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या नावे वकिलामार्फत एक नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. या महिलेशी लग्न करण्यासाठी सिद्धांत शिरसाट यांनी हातावर, शरीरावर ब्लेडने जखमा करून घेतल्या तसेच लग्नासाठी ब्लॅकमेलं केलं. तू माझ्यासोबत लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेना, अशी धमकी दिली. तसेच सिद्धांत सिरसाट यांनी या महिलेला ब्लेडने जखमा करून ते फोटो इन्स्टाग्राम तसेच मोबाईलवर शेअर केले असा आरोप या नोटिशीत करण्यात आला आहे. तसेच सात दिवसाांच्या आत या महिलेला नांदावयास न नेल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सूचना या महिलेचे वकील अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांनी दिली आहे.

दरम्यान, संजय शिरसाट किंवा त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी अद्याप या प्रकरणावर भाष्य केलेलं नाही. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)