दोघेही प्रेरणादायी; RSS ने का असे म्हटले की, गांधी आणि हेडगेवार यांच्या तुलनेची गरज नाही

महात्मा गांधी, हेडगेवारImage Credit source: गुगल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी शनिवारी नागपूर येथे आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार आणि महात्मा गांधी यांच्या तुलनेबाबत विचार मांडले. ते म्हणाले की या दोघांची तुलना करण्याची गरज नाही. दोघांनी पण देशासाठी आणि समाजासाठी उत्कृष्ट काम केले आहे. ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत, असे आंबेकर म्हणाले. डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी-एक दर्शन या पुस्तकाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. देशाची फाळणी ही स्वातंत्र्यापूर्वी हिंदूचा कमकुवतपणा वा तत्कालीन नेतृत्वाची कमजोरी या कारणामुळे झाली का, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

गांधीजी आणि डॉ. हेडगेवारांविषयी काय विचार?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख आंबेकर यांच्या मते, महात्मा गांधी आणि आरएसएस संस्थापक डॉ. के. बी. हेडगेवार यांचे काम देश आणि लोकांच्या हितासाठी होते. या दोघांमध्ये तुलना करण्याची गरज नाही. कारण दोघांनी चांगले काम केले आहे. दोन्ही नेते आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. दोघांनी देशाची सेवा केली. देश, लोक आणि हिंदू समाजासाठी दोघेही झटत राहिले. फाळणीविरोधात डॉ. हेडगेवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. तर गांधी म्हणाले होते की, फाळणी माझ्या मृतदेहावर होईल, असे आंबेकर यांनी सांगितले.

डॉ. हेडगेवार आणि गांधीजी यांचा दृष्टिकोन स्पष्ट होता, दोघांना देश एकजुट ठेवायचा होता. देशासमोर एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या वाद आणि संशोधनाचा विषय आहे की, काय फाळणी ही आम्हा हिंदूच्या कमकुवतपणामुळे झाली की आपल्या तत्कालीन नेतृत्वाच्या कमजोरीमुळे झाली? असा सवाल त्यांनी केला.

मनमोकळ्यापणा समीक्षा व्हावी, तेच चांगले

देशाचे अखेर विभाजन झाले. काहींच्या मते हा विषय तिथेच संपला. पण वास्तवात तसे घडले नाही. पहलगाम हल्ल्यासह पाकिस्तानातून भारतावर होणाऱ्या हल्ल्याचा त्यांनी उल्लेख केला. तर पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूवरील हल्ल्याचा उललेख सुनील आंबेकर यांनी केला.

आंबेकर म्हणाले की आपण भारतीय आहोत आणि हजारो वर्षांपासून या भूमीवर, जमिनीवर राहत आहोत. आपण हिंदू आहोत. परंपरानुसार सुद्धा हिंदू आहोत. या लोकशाही राष्ट्रात आणि प्रगतीशील समाज म्हणून राष्ट्रीय प्रतिकांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पण खुल्या मनाने, खुल्या विचाराने समीक्षा करणे, विश्लेषण करणे आवश्यक असल्याचे आंबेकर म्हणाले. जोपर्यंत आपण खुल्या दिलाने आपल्या इतिहासाचे विश्लेषण करणार नाही, तोपर्यंत आपण भविष्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकणार नाही, असे सुनील आंबेकर म्हणाले.

संघ शिबिराला गांधीजींची भेट

यावेळी सुनील आंबेकर यांनी दावा केला की, त्यावेळी महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरीला भेट दिली होती. त्यांनी दावा केला की, 1937 मध्ये संघाच्या शिबिराला भेट देत गांधीजींनी हेडगेवार यांच्याशी चर्चा केली होती. 1947 मध्ये गांधीजींनी दिल्लीती वाल्मिकी मंदिरातील एका संघ शाखेला पण भेट दिली होती, असे ते म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)