वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. पहिल्यादिवसापासूनच या प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचेही नाव घेतले जात होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबर पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, आता जालिंदर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी, ‘माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. सत्य समोर यायला हवं, मी चौकशीला तयार आहे’ असे म्हटले आहे.
काय म्हणाले डॉ. जालिंदर सुपेकर?
जालिंदर सुपेकर हे शशांक हगवणेचे मामा आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांचे नाव चर्चेत आले. मात्र, आता जालिंदर यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळले आहेत. मागील दोन वर्षांपासून मी तुरुंग विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे. त्यामुळे कार्यकारी पोलीस दलातील कोणताही घटक माझ्या नियंत्रणाखाली नाही. परिणामी, मी कोणालाही सूचना देण्याच्या स्थितीत नाही. हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कोणत्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीत. त्यांच्या कृत्याचा मी यापूर्वीही निषेध केला आहे, असे कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणी हगवणे कुटुंबीयांना मदत केल्याचा आरोप डॉ. सुपेकर यांच्यावर करण्यात आला आहे.
वाचा: रिसॉर्ट बुकींग ते डब्बा पुरवणे, काँग्रेसच्या ‘या’ माजी मत्र्यांच्या मुलानेच केली हगवणेची मदत
नेमकं काय?
डॉ. जालिंदर सुपेकर यांचा धाक दाखवून हगवणे कुटुंबीय घरातील सुनांना त्रास देत आणि धमकावत असत. जेव्हा मयुरी हगवणे (राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या मुलाची पत्नी सुशील यांची पत्नी) यांनी तक्रार केली, तेव्हा हगवणे कुटुंबीय फरार झाले होते. नंतर परत आल्यानंतर त्यांनी मयुरीच्या कुटुंबाला धमकावले की, “तुम्ही आमचे काही बिघडवू शकत नाही.” डॉ. सुपेकर यांचे पाठबळ असल्याचे दाखवत हगवणे कुटुंबीयांनी सुनांना त्रास देणे सुरूच ठेवले.
काय आहे प्रकरण?
वैष्णवी हगवणेनं मुळशी इथल्या सासरच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या वडिलांनी अनिल कस्पटे यांनी, तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये त्यांनी शशांक, लता, करिश्मा, राजेंद्र आणि सुशील यांनी तिला मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला. लग्नात ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली तरी सासरच्या लोकांनी २ कोटींची मागणी केली, असं कस्पटे कुटुंबाचं म्हणणं आहे. वैष्णवीच्या शरीरावर जखमांचे डाग आढळल्यानं हे प्रकरण आत्महत्या की खून, याचा तपास अजून सुरू आहे.