शासकीय कार्यक्रमात मंत्र्याचे खाते बदलले? मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ‘पाण्याशी संबंधित खाते यामुळे…’

जळगावातील कार्यक्रमात मंत्र्यांचे खाते बदलले. Image Credit source: TV 9 Marathi

Jalgaon Gulabrao Patil: शासकीय कार्यक्रमात प्रोटोकॉलला महत्व असते. प्रोटोकॉल काळजीपूर्वक पाळला गेला पाहिजे, त्यावर वरिष्ठ अधिकारी सातत्याने लक्ष ठेऊन असतात. परंतु जळगावातील पोलीस दलाच्या कार्यक्रमात मंत्र्याचे खाते बदलण्याचा प्रकार घडला आहे. जळगावातील पोलीस दलाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावासमोर जलसंपदामंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला. त्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

जळगाव पोलीस दलातील कार्यक्रमात डिजिटल स्क्रीन बोर्डवर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावासमोर जलसंपदा मंत्री असल्याचे नमूद केले गेले. यामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाला जळगाव जिल्ह्यातीलच मंत्री असताना सुद्धा मंत्र्यांच्या खात्याचा विसर पडला, अशी चर्चा रंगली. गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री असतानाही त्यांच्या नावासमोर जलसंपदा मंत्री नमूद करण्याची पोलीस दलाकडून चूक झाली.

गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा…

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असताना गुलाबराव पाटील यांच्या नावासमोर जलसंपदा खाते लिहिण्याची पोलीस दलाकडून चूक झाली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलाचा स्मार्ट इ बीट सॉफ्टवेअर प्रणालीचा उद्घाटन कार्यक्रमात हा प्रकार समोर आला. नावासमोर जलसंपदा खाते असल्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

गुलाबराव पाटील यांनी काय म्हटले…

पोलीस दलातील कार्यक्रमात झालेल्या प्रकाराबद्दल गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, पाणीपुरवठा आणि जलसंपदा दोन्ही खाते पाण्याशी संबंधित आहे. यामुळे ही चूक झाली असले. मला त्याचे काहीच वाईट वाटले नाही, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

काय आहे स्मार्ट ई-बीट सिस्टीम

स्मार्ट ई-बीट सिस्टीम ही एक अत्याधुनिक, पूर्णपणे डिजिटल आणि रिअल-टाइम पेट्रोलिंग प्लॅटफॉर्म आहे. यामुळे पोलीस पेट्रोलिंग अधिक चांगली, पारदर्शक आणि कार्यक्षम होते, त्यासाठी हे सॉफ्टवेअर डिझाइन केले आहे. ही प्रणालीचे मोबाईल अॅप आणि वेब अॅप्लिकेशन्स आहे. देशातील काही भागांत यापूर्वीच ही प्रणाली लागू केली आहे. पोलीस दलासाठी क्रांतीकारक ही प्रणाली ठरणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)