वैष्णवी हगवणे, रोहिणी खडसेImage Credit source: TV 9 Marathi
पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिला आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. हगवणे कुटुंबाबाबत आलेल्या तक्रारीवर महिला आयोगाने कारवाई केली असती तर आज वैष्णवी जिवंत असती. त्यामुळे वैष्णवीच्या मृत्यूला महिला आयोग जबाबदार आहे, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
रोहिणी खडसे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, वैष्णवीच्या प्रकरणात महिला आयोगाच्या अक्षम चुका दिसत आहे. महिला आयोगाकडे जवळपास 32 हजार केसेस पेंडिंग आहेत. त्यामुळे आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कमी पडत आहे. आयोग महिलांना लवकर न्याय देत नाही. कारण महिला आयोगाचे अध्यक्ष हे पार्टटाइम आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा या अजित पवार यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे पार्ट टाईम महिला आयोगाच्या अध्यक्ष बदलून पूर्ण वेळ अध्यक्ष महिला आयोगाला द्यावा, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप हिनेसुद्धा माहिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीमध्ये सासऱ्याने मारहाण केल्याचा उल्लेख होता. त्यानंतरसुद्धा आयोगाने कारवाई केली नाही. उलट महिला आयोगाने ही घटना समोपचाराने मिटवली. या प्रकरणात आयोगाने हगवणे कुटुंबाला पाठिशी घातले. कारण ते राजकीय पक्षाचे पदाधिकारी होते, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.
रोहिणी खडसे यांनी पुढे म्हटले की, मी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचा आक्रोश पाहिला. या घटनेमध्ये काय, काय झाले असेल याचा अंदाज लावण्यात आला. वैष्णवीच्या अंगावरती 19 ठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्याचे फोटो पाहून मारहाणीची अत्यंत क्रूरता पाहायला मिळाली. आम्ही कस्पटे कुटुंबियांना न्याय मिळवू देण्यासाठी त्यांच्या पाठीशी आहोत.
वैष्णवीच्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात एफआयआरमध्ये सौम्य कलमे लावण्यात आलेले आहेत. ती कलमे कठोर करुन हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे. ज्यामुळे वैष्णवीला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळेल, अशी मागणी देखील रोहिणी खडसे यांनी केले.