Vaishnavi Hagavane Death Case : वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणला पोलीस करणार अटक

पुण्यातील विवाहीत महिला वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात काल तिचे सासरे आणि दीर यांना अटक करण्यात आली. तिचा नवरा, नणंद आणि सासू आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. काल पहाटे पोलिसांनी कारवाई करक स्वारगेट परिसरातून सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांना अटक केली असून त्यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान याच प्रकरणात आता आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस हे निलेश चव्हाणला अटक करणार आहेत. वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना निलेशने धमकावलं असा आरोप आहे.

त्यामुळे आता वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आमची मुलगी, वैष्णवी हिचा छळ करण्यामध्ये आणि हगवणे कुटुंबीयांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंड निलेश चव्हाणचा देखील सहभाग आहे, असा आरोप कुटुंबियांना केला होता. या प्रकरणी आता पिंपरी चिंचवड पोलीसांच्या गुन्हे शाखेची दोन पथके निलेश चव्हाण शोध घेत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बालाला घेण्यासाठी तिचे माहेरचे गेले होते, मात्र निलेश चव्हाण याने बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीचं बाळ त्यांना देण्यास नकार दिला होता ,त्याबाबत त्याच्या विरुद्ध पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र निलेश चव्हाण अजूनही फरार आहे.

दरम्यान आज राज्याचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी 4 वाजता कस्पटे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कस्पटे कुटुंबियाशी फोनवरून संवाद साधत त्यांचं सांत्वन केलं होतं तसंच याप्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा करून, तुम्हाला पाहिजे तो वकील देऊ असं आश्वासनही दिलं होतं. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल संध्याकाळी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.

फरार असताना राजेंद्र हगवणे शेतातील शेडमध्ये लपले

वैष्णवी यांचा मृत्यू झाल्यानंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे फरार झाले होते. यादरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी वास्तव्य केल्याचं पोलीस तपासात समोर आल आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या पुसेगाव येथील अमोल जाधव नामक व्यक्तीच्या शेतातील जनावराच्या शेडमध्ये देखील मुक्काम केल्याची माहिती समोर येत आहे.. फरार असताना राजेंद्र हगवणे नेमके कुठे कुठे थांबले होते, त्यांना कोणी मदत केली होती याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

51 तोळ्यांचे दागिने बँकेकडे गहाण

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र, दीर सुशील यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. दोघांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. वैष्णवी यांना विवाहात देण्यात आलेले 51 तोळे सोन्याचे दागिने बँकेकडे गहाण ठेवण्यात आले आहे. वैष्णवीला तिचे सासरे आणि दिराने वेळोवेळी मारहाण केल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. तपासासाठी दोघांना 28 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एच. बारी यांनी शुक्रवारी दिला.

दोन वर्षांपूर्वी वैष्णवीचा आत्महत्येचा प्रयत्न

सासरच्या छळाला कंटाळलेल्या वैष्णवी हगवणेने दोन वर्षांपूर्वी, म्हणजेज 27 नोव्हेंबर 2023 रोजी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिने कीटकनाशक प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी खासगी रुग्णालयाकडून उपचारांची कागदपत्रे मिळवली आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)