पत्राचाळ प्रकरणी अटक झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत हे जवळपास शंभरहून अधिक दिवस आर्थर रोड तुरुंगात होते. तुरुंगातील या अनुभवावर त्यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिलंय. काही दिवसांपूर्वीच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात राऊतांनी अनेक प्रसंगांचं सविस्तर वर्णन केलं आहे. अशाच एका प्रसंगात त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा उल्लेख केला आहे. ज्यावेळी संजय राऊत तुरुंगात होते, त्याचवेळी आर्यन खानसुद्धा ड्रग्जप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात होता. कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी त्याला आणि त्याच्या मित्रांना एनडीपीएसअंतर्गत अटक करून आर्थर रोड तुरुंगात आणलं होतं. आर्यन जवळपास एकवीस दिवस तुरुंगात होता. आर्यन आणि त्याच्या मित्रांचाही मुक्काम राऊतांच्या 10 नंबर यार्डात होता.
‘आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडले नाहीत आणि त्याने अमली पदार्थांचं सेवनही केलं नव्हतं, हे नंतर तपासात उघड झालं. पण कोणाची तरी खाज म्हणून पैसा आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशा अटका होतात’, असं राऊतांनी या पुस्तकात म्हटलंय. आर्यन तुरुंगात असताना सहसा काहीच खात नसायचा. मिळालंच तर फळं आणि पाण्यावर गुजराण करायचा, असा खुलासा त्यांनी या पुस्तकातून केला. इतकंच नव्हे तर तो तुरुंगात कोणाशीच बोलत नसे. एक दिवस राऊतांच्या यार्डातील सहाय्यक समोर आला. त्याने इम्पोर्टेड ब्रँडेड टी-शर्ट घातला होता. राऊत त्याला म्हणाले, “विनोद, ये एकदम भारी टी-शर्ट पहना है”, त्यावर सहाय्यकाने उत्तर दिलं, “हाँ साब, दस नंबर में आर्यन खान के साथ था. जाताना त्याने मला त्याचं टी-शर्ट दिलं.”
आर्यन खानला तुरुंगात छळण्याचा प्रयत्न झाला, तो पैसे उकळण्यासाठीच, असा आरोप राऊतांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासुद्धा त्यावेळी तुरुंगात होता. त्याला जाणीवपूर्वक जनरल यार्डात ठेवलं गेलं होतं. त्यामुळे शंभर-सव्वाशे बंदींसोबत त्याला दिवस काढावे लागले होते. “राज कुंद्राला सवलती द्या म्हणून अनेकांचे फोन आले. पैशांची ऑफर झाली, पण आम्ही ते काहीच जुमानलं नाही”, असं एक दिवस जेलच्या एका बड्या अधिकाऱ्याने राऊतांना सांगितलं. परंतु ती मला थापेबाजी वाटली, असं स्पष्ट त्यांनी आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात म्हटलंय. जेल पैशावरच चालते आणि चालविलीही जाते, यावर माझी श्रद्धा असल्याचं त्यांनी पुढे लिहिलंय.