चर्चा तर होणारच, शरद पवार यांच्या आमदाराने मानले अजित पवार यांचे आभार

अजित पवार यांचे आभार व्यक्त करणारे बॅनर.Image Credit source: TV 9 Marathi

Ajit Pawar And Sharad Pawar: राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर पक्षावर आपली पकड मजबूत केली. त्यानंतर शरद पवार यांनी नव्याने पक्षाची बांधणी सुरु केली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकाही केली. परंतु अनेक कार्यक्रम किंवा कौटुंबीक सोहळ्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात होत असते. आता शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांचे आभार मानणारे बॅनर लावले आहे. त्या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो आहे. त्यामुळे बीडमध्ये हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.

का लावले बॅनर?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. चार दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीचे बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील अनेक विषयांसह शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या मागण्या देखील पूर्ण करण्यात आल्यात. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांचे आभार मानणारे बॅनर लावले. हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

सध्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन आमदार आहे. परंतु शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार आहेत. त्यांच्याकडून अजित पवार यांचा फोटो लावून बीडमध्ये बॅनर लावले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली. कारण त्यांच्या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचे फोटो आहेत. त्या बॅनरवर म्हटले आहे की, अजित पवार साहेब यांनी बीड मतदार संघातील विविध विकास कामांसाठी भरघोस विकास निधी मंजूर करण्यासाठी ठोस पाऊल उचलले. त्याबद्दल दादांचे मन:पूर्वक आभार.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)