मध्यरात्री सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारी मुलगी नक्की आहे तरी कोण?

Salman Khan Home Invasion Woman Attempts Entry, ArrestedImage Credit source: tv9 marathi

सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 19 मे च्या मध्यरात्री एका महिलेने सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या महिलेला रोखणं शक्य झालं. ही महिला सलमान खानच्या घराच्या लिफ्टपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली, पण नंतर रक्षकांनी तिला पकडले आणि लगेच पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मुलीचा सलमानच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला 32 वर्षांची असून तिचे नाव ईशा छाबरा असल्याचे सांगितले जात आहे. 19 मे रोजी पहाटे 3.30 वाजता ईशाने सलमानच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर लगेचच वांद्रे पोलिस स्टेशनला कळवण्यात आले आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. ईशा छाब्राला अटक करण्यात आली आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून कसून तपास सुरु

ईशा छाब्रा मध्यरात्री सलमान खानच्या घरात का घुसण्याचा प्रयत्न करत होती हे आता पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तिचा हेतू काय होता? ती सलमान खानची चाहती होती की यामागे आणखी काही खोलवरचे षड्यंत्र होते? हे सर्व प्रश्न आता पोलिस शोधत आहेत.

मुलीची चौकशी सुरू

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशा छाब्राची कसून चौकशी सुरू आहे. ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे की तिने काही दबावाखाली हे पाऊल उचलले आहे हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. तिच्या कुटुंबाची आणि पार्श्वभूमीची माहिती देखील गोळा केली जात आहे. खार परिसरात राहणारी ही मुलगी म्हणत आहे की ती चुकून सलमानच्या इमारतीत आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला खार पश्चिम परिसरातील रहिवासी आहे, म्हणजेच ती गॅलेक्सी अपार्टमेंटजवळील परिसरात राहते.

छत्तीसगडमधील एका तरुणानेही असाच काहीसा प्रयत्न केला

ईशाच्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 20 मे रोजी संध्याकाळी 7:15 वाजता, एका माणसाने देखील सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीचे नाव जितेंद्र कुमार सिंह आहे आणि तो 23 वर्षांचा आहे. जितेंद्र कुमार सिंह हा छत्तीसगडचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचाही पोलिस तपास करत आहेत. एकामागून एक घडलेल्या या घटनेमुळे सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)