ती अन्याय सहन करत राहिली, तेव्हाच आवाज उठवला असता तर.. वैष्णवीच्या जावेने काय सांगितलं ?

मयुरी हगवणेनी सांगितलं आपबितीImage Credit source: TV9 Marathi

पुण्याच्या मुळशी जवळच्या एका गावात राहणारी विवाहीत महिला वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूचं प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ करत तिचा बळी घेतल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्यांनी केला आहे. आठवड्याभरापूर्वी वैष्णवीने छळाला कंटाळून आत्महत्या केली, तिच्या मागे अवघ्या 9 महिन्याचं बाळही आहे. मात्र सासरच्यांचा छळ, मारहाण, क्रूर वृत्ती यामुळे वैष्णवीने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. पण ही आत्महत्या नसून हुंडाबळीचा प्रकार असल्याचा आरोप तिच्या घरच्यांकडून, कस्पटे कुटुंबाकडून हत असून हगवणे कुटुंबावर मकोका लावून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

वैष्णवीचा पती शशांक, सासू, सासरे,नणंद यांच्यावर आरोप होत आहेत, मात्र त्यांच्या घरातील ही काही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीहीव हगवणे कुटुंबावर छळाचे,मारहाणीचे आरोप झाले असून त्यांच्याविरोधात पोलीसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप (-हगवणे), ती त्यांच्या मोठ्या मुलाची बायको. जानेवारी महिन्यापासूच मयुरीने हगवणे यांचं घरं सोडलं असून ती माहेरी आई-भावासोबत राहत्ये. वैष्णवीप्रमाणेच मयुरीचाही अतोनात छळ झाला असून तिची साथ देतो म्हणून हगवणे कुटुंबियांनी मुलाचाही छळ केला, मारहाण केला,असा आरोप मयुरीने केला आहे.

तिच्यासोबत नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया.

मयुरीचं सुशील हगवणे यांच्याशी लग्न झालं पण तेव्हापासूनच मयुरी यांची नणंद, दीर, सासू तिला कायम टॉर्चर करायचे. या सगळ्या प्रकाराचा घटनाक्रम, कसा छळ झाला हे मयुरीनेच सविस्तर सांगितलं. ” 2022 मध्य माझा सुशील यांच्याशी विवाह झाला. पण माझे दीर, नणंद, आणि सासू सतत त्रास द्यायचे, छळ करायचे. माझ्या सासूने कधी माझे लाड केले तर माझी नणंद त्यांना ओरडायची, मयुरीचे लाड का करते, तिच्याशी असं वागू नको सांगायची. ते सगळे मिळून छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पण त्रास द्यायचे. पण त्यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझे मिस्टर, सुशील हे सतत माझ्या पाठिशी होते. त्यांनी कायम मला पाठिंबा दिला. पण ते पाहून माझ्या सासरचे लोक मिस्टरांनाही त्रास द्यायचे , त्यांच्या मुलालाही त्यांनी सोडलं नाही. ते माझी बाजू कायम घ्यायचे म्हणून सुशील यांनाही मारहाण करायचे ” असं मयुरीने सांगितलं.

” दीड वर्षांपासून आम्ही वेगळं घर घेऊन रहात होतो, पण त्या घरच्यांनी ते कधी यशस्वी होऊ दिलं नाही. आम्ही कधी भाड्याने घर घेतलं तर तर ते टिकू द्यायचे नाहीत. माझ्या मिस्टरांचे काही जमिनीचे व्यवहार सुरू असतील तर ते काम त्यांना मिळू नये म्हणून दीर आणि सासरे मध्ये यायचे. माझी नणंद आणि दीर दोघांनीही माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. काहीही करून आम्हाला टॉर्चर व्हायला पाहिजे, शारीरीक , मानसिक त्रास व्हायला पाहिजे अशी त्यांची वृत्ती होती “, असा आरोपही मयुरीने केला.

वैष्णवीने आवाज उठवला असता तर…

वैष्णवी माझी सख्खी जाऊ होती, पण मला कधीच तिच्याशी बोलूही दिलं नाही. माझे मिस्टरही सासरच्यांना सांगायचे की तिला (वैष्णवी) एवढा त्रास देऊ नका. तुमच्या घरात पण मुलगी आहे आणि तीही (वैष्णवी) मुलगीच आहे ना कोणाची तरी.. तुमच्या मुलीला त्रास झाला तर कसं वाटेल? असं म्हणत माझ्या मिस्टरांनी घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा माझी सासू म्हणायची की तू शांत बसं. तुला माहित्ये का वैष्णवी घरात सोन्याचा घास खात्ये.

आम्ही त्यांच्या शेजारच्या रूममध्येच रहायचो, पण दीड वर्षांत त्यांच्याशी काही संबंध आला नाही. तिला खूप मारहाण झाल्याचं दोन महिन्यांपूर्वी कळलं होतं, घरात काम करणाऱ्या लोकांकडूनच मला माहिती मिळाली होती, पण आम्ही काहीच बोलू शकत नव्हतो. कारण कधी माझ्या मिस्टरांनी बोलायचा, समजावायचा प्रयत्न केला तर शशांक हगवणे नेहमी म्हणायचा की तू, तुझ्या बायकोपुरतं बघ. आमच्यात पडू नको. एवढंच नव्हे तर माझ्या नवऱ्यावरतीच, त्याचा भाऊ असूनही शशांकने संशय घेतला होता,  म्हणून आम्ही त्यात पडलोच नाही, असं मयुरीने सांगितलं.

पण वैष्णवीने वेळीच या अन्यायाविरोधात आवाज उठवला असता तर आज ती जिवंत असती, असं म्हणत मयुरीने खंत व्यक्त केली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)