पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. वैष्णवीने आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे लव्ह मॅरेज झाले होते, पण लग्नानंतर तिचा सासऱ्यांकडून छळ सुरू झाला. आता तिचे सहा महिन्याचे बाळ आई-वडिलांकडे सोपावण्यात आले आहे. पण हे बाळ कुटुंबीयांपर्यंत कसे पोहोचवले? याबाबत वैष्णवीच्या काकांनी माहिती दिली आहे.
वैष्णवीचे काका म्हणाले, ‘आमचं बाळ आमच्या ताब्यात मिळालं आहे. आम्हाला बाकी काहीच बोलायचे नाही. आता आरोपी कसे पकडले जातील एवढच पाहायचं आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडावं आणि योग्य ती शिक्षा द्यावी ही विनंती आहे. हे बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिले.’
वाचा: ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठे वळण! वडिलांनी घेतला यूटर्न, म्हणाले…
पुढे त्यांनी सांगितले की, ‘आम्ही ते आमच्या ताब्यात घेतलं. आमचं बाळ सुखरुप आहे. आम्ही आनंदी आहे. त्यांनी इतर कोणतीही माहिती दिली नाही. आम्ही अज्ञात व्यकीला कोण आहे? काय आहे? हेही विचारलं नाही’
काय आहे नेमकं प्रकरण?
वैष्णवी कसपटे आणि शशांक हगवणे यांचे लव्ह मॅरेज झाले होते. घरच्यांचा विरोध असूनही वैष्णवीने हे लग्न केले. वैष्णवीच्या हट्टाखातर आई-वडिलांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले. या लग्नात शशांकला ५१ तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी देण्यात आली होती. तसेच २० हजार रुपयांचे घड्याळ देण्यात आले होते. काही चांदीच्या वस्तू देखील देण्यात आल्या होत्या. तरीही हगवणे कुटुंबियांची हाव कमी झाली नाही. सतत वैष्णवीला मारहाण करण्यात येत असे. सासरच्यांनी तिचा बराच छळ केला. त्यानंतर वैष्णवीने गळपास लावून आत्महत्या केली आहे. मात्र, वैष्णवीच्या कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरु आहे.
महिला आयोगाचे चौकशीचे आदेश
दरम्यान या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेची दिनांक 19 मे 2025 रोजी स्वाधिकारे दखल घेतली असून राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे चाकणकर यांनी सांगितलं.