ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? उदय सामंतांचा खोचक टोला म्हणाले शाळेतल्या मुलांसारखं…

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्राच्या अस्तित्वापुढे आमची भांडणं, वाद हे शुल्लक आहेत. राज ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला, आमच्यात कधी भांडणं नव्हतीच असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान याबाबत शिवसेना नेते उदय सामंत यांना विचारलं असता, त्यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?  

राज ठाकरे यांच्या समोर घातलेल्या अटी या शाळेतल्या मुलांसारख्या आहेत. राज ठाकरेंचं नेतृत्व एवढं छोटं नाही की जे अटी शर्तीवर झुकतील, उद्या जर राज ठाकरेंनी अट घातली की राहुल गांधी यांना भेटू नका असं म्हटलं तर उद्धव ठाकरे काय करतील? त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावरुन पुढील काळात कोन कोणाकडे टाळी मागतंय ते पाहू असं सामंत यांनी म्हटलं आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया 

दरम्यान पुण्यातील तरुणी वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली, या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. यावर देखील सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.  हा नीच पणाचा कळस आहे. ही  घटना अमानुष आहे. तीन आरोपींना अटक झाली आहे, दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील काही तासात आरोपींना अटक होईल. ही घटना निंदनीय आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी हीच आमची भूमिका आहे. पुन्हा कुणी असं धाडस करू नये अशी शिक्षा आरोपींना दिली जाईल. अशा गोष्टींचा परिणाम समाजावर होतो. पोलीस तपास करत आहेत, डीसीपी विशाल गायकवाड यांच्याशी मी बोललो आहे, असं उदय सामंत यांनी यावेळी म्हटलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)