Vaishnavi Hagawane Death Case Updates: पुणे येथील मुळशीतील वैष्णवी हगवणे हिचा संशयास्पद मृत्यू प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. हगवणे कुटुंबीयांकडून केवळ वैष्णवीला नाही तर त्यांच्या मोठ्या सुनेला त्रास दिला गेला. त्याबद्दल मोठी सुन मयुरी हिने महिला आयोगाकडे तक्रार केली होती. ‘टीव्ही ९ मराठी’ सोबत बोलताना मयुरी जगताप हगवणे यांनी हगवणे कुटुंबातील अनेक धक्कादायक गोष्टी उघड केला.
मयुरी यांनी म्हटले की, हगवणे कुटुंबात मला आणि माझ्या नवऱ्यास त्रास झाला. त्यामुळे आम्ही वेगळे झालो. त्यानंतर किराणा दुकानातून आम्हाला माल घेऊ देत नव्हते. आम्ही वॉशिंग सेंटर सुरु केले. परंतु त्याचाही वीज पुरवठा खंडीत केला होता. आम्हाला आर्थिक अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले गेले. त्या कुटुंबात माझ्या नवऱ्याने खूप वाईट दिवस काढले. त्यांना कामसुद्धा मिळू देत नव्हते. तुम्हाला भीक मागण्यास लावले, असे ते सांगत होते. मलाही वैष्णवीचा नवऱ्याने मारहाण केली होती. मी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवर कारवाई झाली असती तर वैष्णवीला असे पाऊल उचलावे लागले असते, असे मयुरी यांनी सांगितले.
…तर वैष्णवीला साथ दिली असती
वैष्णवीला जो त्रास दिला जात होता, त्याबद्दल मला माहिती नव्हती, असे मयुरी यांनी म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, वैष्णवीने मला तिला होणाऱ्या त्रासची काही माहिती दिली असती तर मी तिला साथ दिली असती. त्या घरात मी विरोध करत होते. बोलत होते. त्यामुळे मी आज जिवंत तुमच्यासमोर आहे. मी गप्प बसले असती तर माझेही वैष्णवीसारखे हाल झाले असते.
आर्थिक व्यवहार एकत्रच
राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनबाई मयुरी जगताप हगवणे यांनी सांगितले की, आम्ही त्याच घरात राहत वेगळ्या खोलीत राहत होतो. आमचे आर्थिक व्यवहार एकत्र होते. त्यामुळे दुसरीकडे शिफ्ट झालो नव्हतो. आमचे नेहमी जाणे-येणे होत होते. वैष्णवी हिला जो त्रास दिला जात होता, तो आम्हाला सासरच्या मंडळींनी कधी कळू दिला नाही. कारण त्याला मी आणि माझ्या नवऱ्याने विरोध केला असता. तसेच माझे आणि वैष्णवी यांचा फारसा संवाद नव्हता. वैष्णवीच्या माहेरची मंडळीसुद्धा कधी माझ्या संपर्कात नव्हती, असे मयुरी यांनी सांगितले.
सासरे राजेंद्र हगवणे यांनी आपल्यावर हात उचलला होता. सासू, दीर आणि नणंद यांच्याकडून आपल्याला कायम त्रास देण्यात आला. त्यामुळे मागील दीड वर्षांपासून आम्ही वेगळे झालो होतो, या आठवणी सांगताना मयुरी यांचे डोळे पाणावले. वैष्णवी हिचे बाळ कुठे आहे, हे मला माहीत नाही. त्या बाळाला या लोकांनी मला पाहू सुद्धा दिले नव्हते, असे मयुरी यांनी सांगितले.