पत्नीच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल, मुंबई पोलिसाने आयुष्य संपवलं; मृतदेहाजवळ सुसाईड नोट…

मुंबई : धारावी येथील शाहू नगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले ३८ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल विजय साळुंखे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट प्राप्त झाली आहे. ज्यात कॉन्स्टेबलने पत्नीवर छळ केल्याचा आरोप केला आहे. या जोडप्याला एक मुलगी आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल विजय साळुंखे हे ३० मे पासून प्रकृतीच्या कारणामुळे रजेवर होते. शुक्रवारी, १४ जून रोजी संध्याकाळी ते सायन येथील प्रतिक्षा नगर परिसरातील त्यांच्या राहत्या घरात ते पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. कॉन्स्टेबल साळुंखे यांनी आत्महत्या केली तेव्हा ते घरात एकटेच होते. त्यांचे कुटुंबीय घरी आले असता त्यांनी विजय साळुंखे हे पंख्याला लटकलेले दिसले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

साडे आठच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नंतर पोलिसांनी साळुंखे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळी एक सुसाईड नोटसुद्धा पोलिसांना मिळाली आहे. ज्यात विजय साळुंखे यांनी आपल्या पत्नीने केलेल्या छळाबाबत लिहले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.