Bakri Eid 2024: ‘लाख’मोलाचे बकरे; राजस्थानातील बकऱ्याची सर्वत्र चर्चा, १७० किलो वजन, किंमत वाचून शॉक बसेल

मुंबई : ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी बकऱ्यांना दिलेली बॉक्सर, गब्बर अशी नावे, शिरोई, मेवात तोतापुरी अशा वेगळ्या प्रजाती, रूबाबदार आणि वजनदार बकऱ्यांना सध्या मुंबईत मोठी मागणी आहे. निमित्त आहे ते १७ जूनला होणाऱ्या बकरी ईदचे. या बकऱ्यांमध्ये सर्वाधिक किंमत साडेचार लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. अगदी १० हजार रुपयांपासूनचे बकरे विक्रीसाठी देशभरातून मुंबईतील देवनार पशुवधगृह येथे आले आहेत. मुंबईसारख्या शहरात बकऱ्यांना चांगली किंमत मिळत असल्याने मागील आठ ते १० दिवसांपासून व्यापारी दाखल होऊ लागले आहेत. आतापर्यंत एक लाखापेक्षा अधिक बकऱ्यांची विक्री झाली आहे.बकरी ईदनिमित्त मुस्लिमाधर्मीयांमध्ये कुर्बानी करण्याची प्रथा असल्याने बकऱ्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. बकरी ईदच्या कालावधीत देवनार येथे मुंबई महापालिकेच्या पशुवधगृहात सर्वांत मोठे बकरे, मेंढ्यांच्या विक्रीचा बाजार उपलब्ध केला जातो. यंदा ५ जूनपासून ही सुविधा उपलब्ध केली आहे. बकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी सध्याच्या क्षमतेसह अतिरिक्त ७५ हजार चौरस मीटर क्षेत्रावर महापालिकेकडून निवारा उभारण्यात आला आहे. गाळ्यांसह अन्य सुविधाही उपलब्ध केल्या आहेत.

मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीरसह महाराष्ट्रातील काही भागांतूनही व्यापारी मुंबईत विक्रीसाठी बकरे आणतात. यंदा दीड लाखांहून अधिक बकरे विक्रीसाठी आले आहेत. अगदी १७० किलो आणि त्यापेक्षा अधिक वजनाचे बकरे विक्रीसाठी आहेत. शनिवारपर्यंत एक लाख पाच हजार बकऱ्यांचीही विक्री झाली होती. गेल्या वर्षी एक लाख ७७ हजार बकरे विक्रीसाठी आणले असताना एक लाखाहून अधिक बकऱ्यांची विक्री झाली होती.

वजनदार, रुबाबदार बकऱ्यांना भाव

बकऱ्याची जात, वजन, रुबाब आणि देखणेपणावर त्यांची किंमत ठरते. शिरोई जातीचा बकरा हा देखणा असतो आणि विरोधी बकऱ्याला चितपट करण्यात पटाईत असलेल्या या बकऱ्याला ‘बॉक्सर’ असे संबोधतात. मेवात तोतापुरी जातीच्या बकऱ्याला देशविदेशातही मोठी मागणी असल्याचे हरयाणातील मेवातमधून आलेले विक्रेते दिलवार यांनी दिली. त्यांनी आणलेल्या १२९पैकी ६० बकऱ्यांची आतापर्यंत विक्री झाली असून, त्यातील एका बकऱ्याला दीड लाख रुपयांची किंमत मिळाली. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील उमरमिया उस्ताद मागील १५ वर्षे बकरी ईदनिमित्त देवनारमध्ये येऊन विक्री करतात. त्यांच्याकडील ४० बकऱ्यांपैकी दोन बकऱ्यांची अनुक्रमे तीन लाख आणि अडीच लाख रुपयांना विक्री झाली आहे. त्यांच्याकडील १७० किलोचा बकरा साडेचार लाख, तर १६० किलोचा बकरा तीन लाख रु. किंमतीचा आहे. देवनार येथील बाजारात १० हजार, २८ हजार, ४० हजार तसेच ६० हजार रुपये मोजूनही बकरे खरेदी करत आहेत.
Bakri Eid 2024: बकरी ईदनिमित्त मालेगाव बाजार फुलला, बोकडांची लाखांत बोली, किंमत वाचून थक्क व्हाल!
दिवसाला दोन किलो चणे, गहू, दूध

विविध राज्यातून आलेल्या व्यापाऱ्यांकडून बकऱ्यांच्या आठ ते दहा दिवसांच्या खुराकाचीही व्यवस्था मुंबईत दाखल होताच केली जाते. बकऱ्यांना धष्टपुष्ट बनवण्यासाठी दिवसाला एक ते दोन किलो चणे, गहू, हिरवी पाने, मका, दूध असा आहार दिला जातो, असे व्यापारी सांगतात.

देवनारव्यतिरिक्त अन्यत्र विक्री बेकायदा

जोगेश्वरी, वांद्रे, भायखळासह अन्यत्र बकऱ्यांची विक्री होते. मात्र देवनारव्यतिरिक्त अन्यत्र बकऱ्यांची विक्री करणे बेकायदा आहे. देवनारमधील बकऱ्यांच्या विक्रीची नोंदणी होते, असे ऑल इंडिया शिप अँड गोट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अस्लम कुरेशी यांनी सांगितले. देवनार पशुवधगृहात व्यापाऱ्यांना आधी ऑनलाइन बुकिंग करावे लागते, यामध्ये बकऱ्यांची संख्या, वाहन क्रमांक इ. माहिती द्यावी लागते. प्रत्येक बकऱ्यामागे १८१ रु. असे १२ दिवसांचे शुल्क महापालिकेला अदा करावे लागते. त्यानुसार महापालिकेकडून व्यापाऱ्यांना कार्डही मिळते.