बाल हक्क न्याय मंडळाने जामीन मंजूर करण्यात अनेक चुका केल्या आहेत, असा अहवाल समितीने नोंदवला आहे. केलेल्या चुकांबाबत पाच दिवसात स्पष्टीकरण मागवलं आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी स्पष्ट केलं आहे.
१५ तासांत जामीन, १०० पानी अहवालात चुकाच चुका
पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी बाल हक्क न्याय मंडळाचे सदस्य एल. एन. धनवटे यांनी जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना एल. एन. धनवटे यांनी या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिणे, वाहतूक व्यवस्थापन करणे, समुपदेशकांची मदत घेणे अशी किरकोळ शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर महिला अणि बालकल्याण विभागाच्या वतीने या निर्णयाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समीतीने तयार केलेल्या १०० पानी अहवालात चुका झाल्याचे नमूद करण्यात आलंय.
पुणे पोर्शे अपघात, दोघांचा मृत्यू
१९ मे रोजी कल्याणी नगर येथे एका लाडोबाने पोर्शे कारने दोघांना उडवलं. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर या बिल्डरच्या मुलाला अवघ्या १५ तासांत अगदी क्षुल्लक अटींवर जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यावरुन प्रशासनाच्या कारभारावर मोठी टीका करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत अल्पवयीन आरोपी मुलगा, बिल्डर वडील विशाल अगरवाल, आई शिवानी अगरवाल, आजोबा सुरेंद्र कुमार अगरवालला अटक करण्यात आली आहे.