मुंबई-पुण्यासह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज मुंबई-पुण्यासह अनेक शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं आहे.

मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

विदर्भातही आज पाऊस

तर, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्याशिवाय, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून काही विभागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भ-मराठवाड्यातील काही जिल्हे अद्यापही पावसाविना

मान्सूनने यंदा वेळेआधीच महाराष्ट्रात हजेरी लावली. तर येत्या चार ते पाच दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, रत्नागिरी आणि मुंबईनंतर आता विदर्भ आणि मराठवाड्याकडे पावसाची वाटचाल सुरु आहे. मात्र, राज्यात गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे विदर्भ-मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाऊस पोहोचलेला नाही.

२० जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय

अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने मान्सूनचा वेगही संथ झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. येत्या २० जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होणार असून राज्यात मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यात आज तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा IMD ने दिला आहे.