पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला, दरम्यान त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला, त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं, पाकिस्तानचे अनेक एअर बेस उद्ध्वस्त झाले.
अखेर भारत आणि पाकिस्तानच्या युद्धविरामासाठी अमेरिकेनं पुढाकार घेतला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तान आणि भारतानं युद्धविरामाची घोषणा केली, या बद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांचं अभिनंदन देखील केलं आहे.
दरम्यान भारतानं युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर आता विरोधकांकडून विशेष अधिवेश बोलावण्याची मागणी होत आहे, तसेच अमेरिकेनं केलेल्या मध्यस्थिच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहेत, यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही पण त्यात किती माहिती दिली जाईल हे सांगता येत नाही. संरक्षणाशी संबंधित काही माहिती देता येत नाही. अशी माहिती गोपनीय ठेवावी लागते. अधिवेशन बोलवायचे असेल तर बोलवा. मात्र त्यापेक्षा सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवून माहिती दिली गेली पाहीजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या युद्धविरामासाठी अमेरिकेनं मध्यस्थी केली यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिमला करार हा भुत्तो आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्यात झाला होता. त्यात आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडवू, आमचा विषय आम्हीच सोडवणार , त्यात इतरांनी हस्तक्षेप करायचा नाही असं ठरलं होतं. मग त्यात आता इतरांनी नाक खूपसण्याचं कारण काय? असा सवाल यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण तुम्ही ही ऐका, मी ही ऐकतो. त्यानंतर बोलू असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं.