देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंब एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. कालपर्यंत ‘साहेब’रूपी काकांचा शब्द खाली पडू न देणारा ‘पुतण्या’रूपी अजितदादा भाजपला जाऊन मिळाले, ही भावना बारामतीकरांना अस्वस्थ करीत आहे. ‘दादांनी साहेबांची या वयात साथ सोडायला नको होती’, ‘साहेबांना पराभवाचा डाग लागता कामा नये,’ या विचाराने ज्येष्ठ नागरिक थोरल्या पवारांकडे झुकताना दिसतात; पण बारामतीच्या विकासाच्या गोष्टी सुरू झाल्या, की येथील नागरिक चढाओढीने ‘दादांनी हे केले, ते केले’, असेही सांगायला विसरत नाहीत. थेट बारामती शहरात जाऊन ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या प्रतिनिधीने बारामतीकरांचा मूड कसा आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट.
दोन्ही पवार हवेत
बारामती नगर परिषदेजवळचा यादगार पान टपरीचा चालक मोईनुद्दीन शेख म्हणतो, ‘आमचे मालक अजिज बागवान यांच्या चार पिढ्यांचे साहेबांशी प्रेमाचे संबंध आहेत. साहेबांमुळे आमचे व्यवसाय सुरळीत आहेत. आम्ही सुरक्षित आहोत. त्यामुळे साहेब आम्हाला जवळचे वाटतात; पण पुढच्या पिढीला कामाचा माणूस असलेले अजितदादाही जवळचे वाटतात. आम्हाला दोन्ही पवार हवेत.’
ऐनवेळी समीकरणे बदलतील?
‘सध्या बारामतीकर संभ्रमात आहेत. साहेब की दादा यापैकी कोणाला साथ द्यायची या विचाराने बुचकाळ्यात पडले आहेत. सद्यस्थितीला अजितदादा विजयाच्या मार्गावर आहेत; पण भावनिक विचार केला आणि पुढील काही दिवसांत समीकरणे बदलली, तर चित्र वेगळे असेल. बारामतीत भाजपविरोधी सूर आहे. दादा अडचणीत होते म्हणून भाजपकडे गेले, अशी चर्चा सामान्य जनतेत आहे. मात्र, २०१४ पासून साहेबांनी प्रत्येकवेळी भाजपला शब्द दिला आणि नंतर तो पाळला नाही. म्हणून दादांसोबत ८० टक्के आमदार भाजपकडे गेले, याचा जनता विचार करीत नाही. सद्सदविवेक बुद्धी असणारा मतदारच हा विचार करेल. वडीलधारी मंडळी भावनिक होऊन विचार करीत आहेत, असे निरीक्षण एका माजी नगरसवेकाने नाव न छापण्याच्या अटीवर नोंदविले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
घरांमध्ये मतांचे विभाजन
तरुण वर्ग, पक्षाचे, संस्थांचे पदाधिकारी दादांसोबत; तसेच जुनी मंडळी साहेबांसोबत आहेत. प्रत्येक घरातही वरिष्ठ साहेबांकडे, तर पुढची पिढी दादांसोबत असल्याने घरात मतांचे विभाजन होणार असल्याचे निरीक्षण ज्येष्ठ नोंदवितात. दादांकडून अपेक्षा असल्या, तरी सुप्रिया सुळे यांच्याकडून अपेक्षा नाहीत. केवळ ‘पवारांची कन्या’ म्हणून त्यांना सन्मान आहे, असे मतही काहींनी मांडले. ‘आम्ही ‘तुतारी’ वाजविणार आहोत,’ असा विश्वास सतीश सावंत यांनी व्यक्त केला.
शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत हे दोघे सांगतील आणि जनता ऐकेल अशीच स्थिती होती; पण फूट पडल्याने सर्वसामान्य मतदाराला महत्त्व आले आहे. त्यांचे मत विचारात घेतले जात आहे, ही महत्त्वाची बाब निवडणुकीत अनुभवायला मिळत आहे.
संतोष जाधव, बारामती
लेक किती दिवस माहेरला राहणार?
‘आम्हाला साहेब आणि दादाही हवेत. साहेबांनी आशिर्वाद द्यावा, मार्गदर्शन करावे आणि दादांना काम करायला संधी द्यावी. लेक किती दिवस माहेरी राहणार? तिने आता तिच्या संसाराकडे लक्ष द्यावे. सुनेला पुढे येऊ द्यावे. सूनसुद्धा तिचे माहेर सोडून सासरी आली आहे. तिला आता सासरच्यांनी अधिकार द्यावा. पुढे येऊ द्यावे,’ अशी प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.