मतमोजणीच्या दिवशी उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर हे मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत होते, असा आरोप आहे. मतमोजणी केंद्रातील खोलीत परवानगी नसतानाही मोबाईलचा वापर केल्याची तक्रार वनराई पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी केली होती. एबीपी माझा वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दरम्यान, शाहांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेता, तहसीलदारांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि भरत शाहांना साक्षीदार बनवलं, याशिवाय एफआयआरची कॉपी देण्यासही नकार दिला, असा आरोप भरत शाह यांनी केला आहे. हे प्रकरण दाबण्याचा आणि गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अखेरच्या फेरीनंतर नाट्यमय घडामोडी घडल्या व त्यात शिवसेनेचे रवींद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले. त्यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आलेल्या मागण्या व त्यावरील कार्यवाही ही पूर्णपणे व्हिडीओ रेकॉर्डिंगसह आणि नियमांचे तंतोतंत पालन करूनच करण्यात आली आहे, असे या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
या मतदारसंघात संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही फेरीत मतमोजणी प्रतिनिधींकडून कोणतीही हरकत प्राप्त झाली नाही. टपाली मतपत्रिकांच्या फेरीच्या जाहीर झालेल्या निकालात अमोल कीर्तिकर यांना एक हजार ५०१, तर रवींद्र वायकर यांना एक हजार ५५० मते प्राप्त होती. अखेरच्या फेरीअखेर मतदानयंत्रांच्या मतमोजणीमध्ये आघाडीवर असणाऱ्या तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यात उमेदवार अमोल कीर्तिकर हे एका मताने आघाडीवर होते. नियमाप्रमाणे अखेरच्या फेरीनंतर टपाली मतपत्रिकांची मतमोजणीची संख्या समाविष्ट करून उमेदवारनिहाय मते जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये वायकर हे ४८ मतांनी आघाडीवर होते.