वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आमदारांना ‘व्हीआयपी वेटिंग’रूम मध्ये बसण्याची विनंती केली. ‘आपण दिलेल्या वेळेत आलो असून, भेट झाली की लगेच निघणार असल्याचे सांगून आमदार ‘पॅसेज’मध्ये उभे राहिले. अर्ध्या तासाहून अधिक काळ ताटकळत उभे राहिल्यानंतरही त्यांना अधिकाऱ्यांकडून बोलावणे आले नाही. तरीही संयम राखून आमदारांनी बोलावणे येण्याची वाट पाहिली. त्यानंतर आमदारांना ‘वेटिंग’मध्ये ठेवल्याचा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात आली. त्यानंतर धावपळ उडाली आणि संबंधितांनी आमदारांना तातडीने बोलावणे धाडले.
बराच काळ उभे राहिल्याने संबंधित आमदारांचा संयम सुटत आला होता. एकदाचे ते संबंधित अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये गेले आणि त्यांना चांगलेच सुनावले. सत्ताधारी आमदार असतानाही ही अवस्था असेल, तर इतरांचे काय, असा प्रतिप्रश्नही त्यांनी अधिकाऱ्यांना केला. ‘नजरचुकीने ही घटना घडली असून, निरोप वेळेवर न देणाऱ्याचे नाव सांगा, आपण त्यांना निलंबित करू,’ असे सांगून पोलिस अधिकाऱ्याने आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘तुम्ही दिलेल्या वेळेप्रमाणे मी भेटायला आलो. आपण दिलेली वेळ पाळत नाही आणि इतरांना कशाला निलंबित करायचे,’ असा प्रतिप्रश्नही आमदारांनी केला. दरम्यान, काही मिनिटांनी वातावरण निवळले आणि आमदार आपली समस्या सांगून अधिकाऱ्याच्या केबिनमधून बाहेर पडले.
आमदारांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घेतलेली ‘शाळा’ पाहून अनेकांना हसू आवरत नव्हते. या प्रसंगाची खमंग चर्चा आयुक्तालयात रंगली होती.