शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्यातील विधानसभा मतदारसंघानुसार उमेदवारांचं स्क्रिनिंग सुरु केलं आहे. बुधवारी शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व संपर्क प्रमुखांना एक अहवाल सोपवण्यास सांगितलं. लोकसभा निवडणूक निकालाच्या आधारे मित्रपक्षांसह किंवा अपक्षांसह विधानसभा निवडणूक लढवल्यास काय होऊ शकतं, याची माहिती ठाकरेंनी माहिती संपर्क प्रमुखांकडे मागितली आहे. आज तकनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
ठाकरेंनी त्यांच्या संपर्क प्रमुखांकडून फीडबॅक मागवला आहे. त्यात १० मुद्दे आहेत. लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार आणि मित्र पक्षाच्या उमेदवाराच्या पदाधिकाऱ्यांनी सोबत काम केलं होतं का, एकमेकांना सहकार्य केलं होतं का, अशा प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरेंनी मागितली आहेत. राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच २८८ मतदारसंघांमध्ये ठाकरेसेनेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
संपर्क प्रमुखांना खालील माहिती द्यावी लागणार
१. लोकसभा निवडणूक २०२४ मधील विधानसभा क्षेत्रनिहाक कामगिरी
२. बूथ प्रमुख योग्य पद्धतीनं निवडण्यात आले का? काम केलेलं नसल्यास त्यामागचं कारण काय?
३. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी शिवसेना उबाठाच्या उमेदवाराचं काम केलं का?
४. शिवसेना पदाधिकाऱ्यानं मविआच्या उमेदवाराचं काम केलं का?
५. तुमचा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी अनुकूल आहे का? असल्यास संभाव्य उमेदवार कोण असावा?
६. संभाव्य विजयाचं समीकरण काय असेल?
७. शिवसेना कोणत्याही आघाडीशिवाय लढली तर काय होईल?
८. मतदारसंघ शिवसेनेला अनुकूल नसल्यास कोणत्या पक्षाला जागा सोडायला हवी? तिथे कोण उमेदवार असायला हवा?
९. बीएलए एजंटची निवडणूक कार्यालयात नोंद आहे का? तुमच्याकडे निवडणूक आयोगाचं ओळखपत्र आहे का? नसल्यास त्यासाठी लगेच अर्ज करा.
१०. लोकसभा निवडणूक २०२४ बद्दल तुमचं मतं काय?