Pune News : पुण्यातील तरूणीला पाकचा पुळका, इन्स्टाग्रामवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहील्याने गदारोळ, थेट अटक

सोशल मीडियावर तरूणीने लिहीली आक्षेपार्ह पोस्टImage Credit source: social media

India Pakistan News : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. मात्र यामुळे बिथरलेल्या पाकने भारतवरच प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने सर्व हल्ले रोखत पाकला धडा शिकवला. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकमधील तणाव वाढला आहे.

मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर एका तरूणीने पाकच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने खळबळ माजली आहे. महाराष्ट्रातील पुणा येथील कोंढवा भागात राहणाऱ्या एका तरूणीने इन्स्टाग्रामवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहील्याचा आरोप असून त्या तरूणीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरूणी पुण्यातील एका कॉलेजध्ये शिकते आणि कोंढला येथील कौसरभाग भागात राहते.

पोलिस कॉन्स्टेबल सुभाष जरांडे यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी (9 मे) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपी मुलीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे या प्रकरणाची पुष्टी करत पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितले.

सोशल मीडियावर पोलिसांची नजर

भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईनतर सोशल मीडियावर पोलीस सतत लक्ष ठेवून आहेत. याचदरम्यान या आरोपी तरूणीची एक आक्षेपार्ह पोस्ट इंस्टाग्रामवर समोर आली, ज्यामध्ये शेवटी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहिले होते.

पोलिसांनी मुलीवर भारतीय दंड संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली आरोप लावले आहेत, ज्यात कलम 152 (भारताची अखंडता धोक्यात आणणे), कलम 196 (समूहांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे), 197 (राष्ट्रीय एकात्मतेविरुद्ध टिप्पण्या), 299 (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेली कृत्ये), 352 (जाणूनबुजून अपमान) आणि 353 (सार्वजनिक अशांतता निर्माण करणारी विधाने) यांचा समावेश आहे.

पुण्यात आंदोलन

या घटनेनंतर ‘सकल हिंदू समाज’च्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला असून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिस संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत आणि सोशल मीडियावरील ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवले जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)