उन्हाळ्यात कलिंगड, खरबूज, बेलफळ अशी अनेक फळे उपलब्ध असतात, अशातच आपण जर फळांचा राजा आंबा याबद्दल बोललो तर त्यासाठी लोकं उन्हाळ्याची वाट पाहतात. गोड, रसाळ आणि सुगंधित आंबे पाहताच ते खावेसे वाटते. तसेच आंबा हा आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. कारण आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी६, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर असे अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. सर्व वयोगटातील लोकांना आंबे खायला आवडतात. पण तुम्हाला माहिती आहे का की आंबा खाताना काही खबरदारी घेतली पाहिजे, अन्यथा त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
आंबा उन्हाळ्यात उपलब्ध असला तरी त्याचे स्वरूप उष्ण असते. आता अशा परिस्थितीत, जर तुम्ही आंबा थेट विकत घेऊन किंवा झाडावरून तोडून खाल्ला तर तुम्हाला बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. आंबा खाण्यापूर्वी तो 3-4 तास पाण्यात भिजवून ठेवावा. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की आंबा खाताना कोणत्या चूका टाळाव्यात…आंबा खाताना कोणती खबरदारी घ्यावी?
आंबा नेहमी पाण्यात भिजवून खावा
आंब्याचे स्वरूप उष्ण असल्यामुळे जर तुम्ही तो धुतल्यानंतर लगेच खाल्ला तर ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. म्हणून, आंबा नेहमी 3-4 तास पाण्यात भिजवून खावा.
जास्त आंबे खाऊ नका
आंबा मर्यादित प्रमाणात खावा अन्यथा तो फायद्याऐवजी नुकसान करू शकतो. तुम्ही दिवसातून 2 ते 3 पेक्षा जास्त आंबे खाऊ नये कारण ते एक उष्ण फळ आहे जे तुमच्या आरोग्याला तसेच तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकते. जास्त आंबे खाल्ल्याने चेहऱ्यावर मुरुमे येऊ शकतात.
पचनसंस्था कमकुवत करते
जास्त आंबे खाल्ल्याने तुमच्या त्वचेवर तसेच तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या जसे की अतिसार म्हणजेच लूज मोशन होऊ शकते.
रिकाम्या पोटी आंबा खाणे
आंबा कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. कारण आंब्यामध्ये फायबर आणि साखरेचे प्रमाण जास्त असते जे पचनसंस्था कमकुवत करू शकते. अॅसिडिटी आणि जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मधुमेहींसाठी आंबा…
आंब्यामध्ये भरपूर नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, म्हणून मधुमेही रुग्णांनी आंबा खाणे टाळावे. कारण ते खाल्ल्याने साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका वाढू शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)