मुंबईकरांनो, रहा सावध.. वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याचा धोका, अग्निशमन दलाने काय काय दिल्या सूचना ?

ढत्या उष्णतेमुळे आग लागण्याचा धोका, अग्निशमन दलाकडून महत्वाच्या सूचनाImage Credit source: social media

सध्या मुंबईसह संपूर्ण देशात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेकांना उष्माघाताचा त्रासही जाणवत आहे. एकूणच, तापमानात लक्षणीय वाढ होत असून वीजेच्या उपकरणांवरही ताण येतो. आणि त्याच्याच परिणामी घर, कार्यालये व औद्योगिक परिसरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबईकर नागरिकांनी खबरदारी घ्‍यावी, असे सल्ला मुंबई अग्निशमन दलाने दिला आहे. सावधगिरी हाच सर्वोत्तम उपाय आहे, ही भावना लक्षात घेऊन नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित मुंबई अग्निशमन दलामार्फत करण्‍यात येत आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे तापमान वाढून वीजेच्या वाहिन्या (इलेक्ट्रिक वायरिंग) गरम होणे, शॉर्टसर्किट होणे, गॅस गळतीच्या घटनांना सुरुवात होणे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, फ्रिज व इतर उपकरणांचा अतिवापर आणि त्या अनुषंगाने वीज वापरावरील ताण या साऱ्यांमुळे आगीच्या घटनांचा धोका अधिक वाढतो. या पार्श्‍वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाच्‍या अखत्‍यारितील अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालयाने (Directorate General FS, CD & HG, New Delhi) दिनांक 1 मे 2025 रोजी परिपत्रक प्रसारित केले आहे. या अनुषंगाने मुंबई अग्निशमन दलातर्फे नागरिकांना उष्णतेच्या लाटेमध्ये घ्यावयाच्या खबरदारीबद्दल आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई अग्निशमन दलाने केलेल्या महत्त्वपूर्ण सूचना :

१. घरगुती व व्यावसायिक ठिकाणांवरील विजेची वायरिंग, प्लग, स्विच बोर्ड्स आणि उपकरणांची नियमित तपासणी करावी.

२. वापरानंतर पंखे, एसी, टीव्ही, मिक्सर, गीझर, इस्त्री इत्यादी उपकरणे त्वरित बंद करावीत.

३. जुन्या किंवा जीर्ण वायरिंगची आवश्यक असल्यास तज्‍ज्ञांच्या मदतीने दुरुस्ती करावी.

४. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी लागणारे सर्व मार्ग (जीने, प्रवेशद्वार) कायम मोकळे ठेवावेत.

५. एकाच प्लग सॉकेटमध्ये अनेक विद्युत उपकरणे लावणे टाळावे. ओव्हरलोडिंग टाळून योग्य प्रकारे विद्युत उपकरणे वापरावीत.

६. वातानुकूलित (AC) यंत्रणेची नियमित देखभाल (maintanace) करणे आवश्यक आहे.

७. घरात, दुकानात किंवा कार्यालयात किमान एक ‘फायर एक्सटिंग्विशर’ ठेवावा आणि त्याचा योग्य वापर शिकून घ्यावा.

८. रात्री झोपताना मोबाईल चार्जिंग किंवा अन्य उपकरणे चालू ठेवणे टाळावे.

९. रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक्स यांनी आवश्यक ती अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवून वेळेवर ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करणे बंधनकारक आहे.

१०. कोणतीही आग लागल्यास वेळ न दवडता १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)