Ashok Chavan : साधारण 50 वर्षे काँग्रेसमध्ये काम करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सध्या भाजपात आहेत. कधीकाळी काँग्रेस पक्षाचे ते महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक नेते होते. दरम्यान, आता हेच अशोक चव्हाण काँग्रेसवर टीका करताना पाहायला मिळतात. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
कोण कोणाला गिळतंय याचा अनुभव…
यावेळी बोलताना ते म्हणले की, हर्षवर्धन सपकाळ अजून नवीन आहेत. त्यांना बराच अनुभव घ्यायचा आहे. मी पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं. कोण कोणाला गिळतंय याचा अनुभव मी घेतलेला आहे. नवीन अध्यक्ष असल्याने त्यांना गिळल्यावर लक्षात येईल की कोण कोणाला गिळतंय, असा हल्लाबोल अशोक चव्हाण यांनी केला.
पक्षाच्या अधोगतीविषयी बोलणं मला…
एखादा पक्ष प्रादेशिक असो किंवा राष्ट्रीय, ज्या पक्षाशी जनतेचा संपर्क असतो तो पक्ष कधीही संपू शकत नाही. दक्षिणेत आजही प्रादेशिक पक्षांचं मोठं अस्तित्व आहे. मीही पन्नास वर्षे काँग्रेसमध्ये होतो. त्यामुळे त्या पक्षाच्या अधोगतीविषयी बोलणं मला योग्य वाटत नाही. मी माझी दिशा स्वीकारली आहे. मी आहे त्या ठिकाणी समाधानी आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?
भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला फोडो आणि रिकामी करा, असे विधान केले होते. ते पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली होती. भाजपा ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे. आता या चेटकिणीचं पोट नेते खाऊन भरलेलं नाही. आता ही चेटकीण काँग्रेसचे कार्यकर्ते खायला निघाली आहे, असं मी म्हणालो होतो. आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानातून ते सिद्ध होत आहे, असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता.
महायुतीतील नाराजीवर नेमकं काय म्हणाले?
महायुतीच्या अंतर्गत नाराजीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महायुती किंवा आघाडीचा सरकार असलं तरी प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्यासाठी राजकीय निर्णय घ्यावे लागतात. समन्वयाचा अभाव आहे हे मी म्हणणार नाही. मात्र समन्वय घडवण्यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेतात. त्यामुळे कोणतीही चिंतेची बाब वाटत नाही. सरकारकडे मोठं बहुमत असल्याने ज्या कोणत्या मतभेदाच्या गोष्टी असतील त्यात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.