अजित पवार यांना शरद पवार कधीच माफ करणार नाही…संजय राऊत यांनी असे का म्हटले?

शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले आहे. सोमवारी माध्यमांशी बोलताना शरद पवार आणि अजित पवार यांच्या नात्यांसंदर्भात वक्तव्य करत राजकारणाबाबतही भूमिका मांडली. अजित पवार यांना शरद पवार राजकीयदृष्ट्या कधीच माफ करणार नाही, असे मत संजय राऊत यांनी मांडले.

संजय राऊत यांनी सांगितले की, अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी होत असतात. कारण दोन्ही नेते अनेक संस्थांवर एकत्र काम करत आहेत. या संस्थांच्या कामांसाठी त्यांच्या भेटी होतात. तसेच कौटुंबिक भेटीही त्यांच्या होत असतात. अमित शाह यांनी अजित पवार यांना हाताशी धरुन राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्याचा त्रास शरद पवार यांना झाला आहे. यामुळे राजकीयदृष्ट्या शरद पवार अजित पवार यांना कधीच माफ करणार नाही. कुटुंबाची नाती वेगळी असतात आणि राजकीय संबंध वेगळे असतात, असे राऊत यांनी म्हटले.

अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याबद्दल संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले. अजित पवार हे भाजपमध्ये सहभागी झाल्याशिवाय कधीही मुख्यमंत्री होणार नाही. त्यांना त्यासाठी आपला गट भाजपमध्ये विलीन करावा लागले. त्यानंतरच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, असे दावा राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी रविवारी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार यांना त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण दिले. त्या भेटीवर बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार यांना पुस्तकाची प्रत हवी होती. त्यामुळे ती देण्यासाठी गेलो होता. त्यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. पहलगाम हल्ल्याबाबत आमची चर्चा झाली. पवार यांचे मत संकटकाळात सरकारसोबत असावे, असे आहे. परंतु हे सरकार त्या योग्यतेचे नाही. राजीव गांधी, मनमोहन सिंग यांच्या सरकारपणे हे सरकार नाही. आमचे २७ लोक मारले गेले. त्यानंतरही अमित शाह खुर्चीवर बसले आहेत. या हल्ल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर काहीच दु:ख दिसत नाही. सरकारने बोलवलेल्या सर्व पक्षीय बैठकीत का आले नाही? याबाबत शरद पवार यांनी विचारणा केली. त्यांना मी सांगितले की, ज्या सरकारच्या काळात अनेक नरसंहार झाले, त्या सरकारच्या बैठकीत मी गेलो नाही. मी गेलो असतो तर अमित शाह यांचा राजीनामा मागितला असता. मग सर्वांची अडचण झाली असती, असे राऊत यांनी म्हटले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)