मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे. कारण मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तीव्र उन्हाच्या झळा बसत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा केवळ २३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात पाणीकपातीला सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ आता मुंबईतील परिस्थितीही चिंताजनक बनली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीसाठा इतक्या खाली आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबई महापालिकेने अद्याप पाणीकपातीचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या १५ मे पर्यंत मुंबईतील सात प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे जल अभियंता विभागाने सांगितले आहे.
मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यानुसार मुंबईत वर्षभरासाठी १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या या धरणात केवळ ४,११,३५५ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीसाठा कमी असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
तीन वर्षांतील धरणांची स्थिती
विविध धरणांमधील सध्याचा पाणीसाठा
- अप्पर वैतरणा – 43961 दशलक्ष लिटर
- मोडक सागर – 35777 दशलक्ष लिटर
- तानसा- 27750 दशलक्ष लिटर
- मध्य वैतरणा- 50325 दशलक्ष लिटर
- भातसा- 163512 दशलक्ष लिटर
- विहार- 9533 दशलक्ष लिटर
- तुळशी- 2861 दशलक्ष लिटर
राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्याची मागणी
दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव साठा भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून देण्यास मान्यता दर्शविली आहे. त्यामुळे तात्काळ पाणीकपातीचा धोका टळला असला तरी, पुढील काही दिवसांतील पावसाचे प्रमाण आणि पाण्याची मागणी यावर परिस्थिती अवलंबून असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावणार की नाही, याबद्दल मुंबई महापालिका निर्णय घेणार आहे.