निलेश लंकेंनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट, नवनिर्वाचित खासदार अडचणीत येणार?

पुणे : नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार तथा शरद पवार गटाचे निलेश लंके हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेऊन आणि त्याने केलेल्या सत्काराचा स्विकार करणाऱ्या लंकेंचा एक व्हिडिओ काही काळापूर्वी समोर आला आहे. या भेटीमुळे लंकेंपुढील अडचणी वाढणार असल्याची चिन्हे आहेत.लोकसभा निवडणुकीआधी पार्थ पवार यांनी देखील मारणेची भेट घेतली होती. त्यावेळी देखील या भेटीवरुन चर्चांना उधाण येत अजित पवार गटावर सडकून टीका झाली होती. त्या भेटीवर अजित पवार प्रतिक्रिया देत म्हणाले होते, ”ती भेट म्हणजे, चूक झाली होती”, असं स्वत: अजित पवार यांनी कबूल केलं होतं. आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी देखील गजा मारणेची भेट घेतल्यामुळे लंकेंनाही टीकेला सामोरे जावे लागणार असं चित्र आता दिसत आहे.
Indresh Kumar : रामभक्ती करुनही अहंकार चढला, तो पक्ष २४१ वर अडला, संघाच्या नेत्याने टोचले भाजपचे कान

गजा मारणेचे राजकीय नेते आणि पुढाऱ्यांशी तसेच मोठ-मोठ्या उद्योगजकांशी असलेले संबंध लपून राहिलेले नाहीत. याआधी देखील अनेकदा नेते मंडळींशी त्याची भेट म्हणजे चर्चेचा विषय ठरत होती. आता लोकसभा निवडणुकीनंतर निलेश लंके यांनी गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. विशेष बाब म्हणजे, तिथे मारणेने लंकेंचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यामुळे हा सत्कार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित खासदार आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

आमदार अमोल मिटकरी काय म्हणाले…

निलेश लंके आणि गजा मारणेच्या भेटीनंतर राजकीय क्षेत्रातून देखील प्रतिक्रिया येत आहेत. यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, पार्थ पवार यांनी जेव्हा गजा मारणेची भेट घेतली होती. तेव्हा तुतारी गटाच्या नेत्यांनी गदारोळ माजवला होता. आता ते कुठे गेलेत? असा प्रश्न मिटकरी यांनी यावेळी केला. पार्थ पवार यांच्या भेटीनंतर स्वत: अजित पवार यांनी सांगितलं होतं की, चूक झाली, अशा लोकांना भेटायला नको होतं. मात्र, आज निलेश लंके सन्मानाने शाल आणि श्रीफळ स्वीकारत आहेत. अहिल्यानगरमध्ये जे गुन्हेगारीच्या ज्या काही घटना घडल्या किंवा गुंडाचा वापर झाला. तेव्हा गजा मारणेचा त्यांना सपोर्ट होता का? असा सवाल देखील मिटकरी यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणुकीमधील चित्र

देश आणि राज्याप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातही भाजपच्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांनी मोठी आघाडी घेत भाजपच्या डॉ. सुजय विखे यांचा पराभव केला. नगरला २००९ नंतर लंकेंच्या माध्यमातून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच विखे विरूद्ध लंके अशी लढत गृहित धरली गेली होती. प्रश्न फक्त लंके कोणत्या पक्षाकडून असतील हा होता. शेवटी अनेक राजकीय डावपेच होऊन लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून उमेदवारी मिळविली. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला. विखे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यातच भाजपकडून त्यांची उमेदवारी जाहीर झाली. ‘एमआयएम’ पक्षाचा उमेदवारही रिंगणात उतरला होता. मात्र, नाट्यमय घडामोडींनंतर ‘एमआयएम’ने माघार घेतली होती.