अजितदादांचा शिवसेना ठाकरे गटाला मोठा दणका; बडा नेता सोडणार उद्धव ठाकरेंची साथ

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला, महायुतीला राज्यात पूर्ण बहुमत मिळालं. तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. राज्यात महायुतीचे तब्बल 232  उमेदवार निवडून आले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते आता महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसत असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटानं ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

धुळे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार शरद पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. ते उद्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

शरद पाटील हे 2004 ला शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र पुन्हा ते ठाकरे गटात परतले. परंतु विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्यानं गेल्या काही दिवसांपासून शरद पाटील नाराज होते, अखेर त्यांनी शिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे धुळे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. त्यांनी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला आहे. शरद पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा धुळ्यात ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान यापूर्वी देखील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)