Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी, आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तसेच इतर योजनांचा पैसा या योजनेकडे वळवला जात असल्याचा आरोपही वारंवार विरोधकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान राज्यात जर पुन्हा आमचं सरकार आलं, तर आम्ही या योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, लाभार्थी महिलांना दीड हजार नाही तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी करण्यात आली होती. मात्र अजूनही 2100 रुपयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये, अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी शक्यता होती, मात्र या अधिवेशनात देखील कुठलाही निर्णय झाला नाही, त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता राज्यातील महिलांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे.

महत्त्वाची बामती म्हणजे एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिलचे पैसे मिळणार आहेत. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)