इजा बिजा तिजा! दादांच्या निर्णयानं बारामतीकरांची मजा; पवारांची बातच न्यारी, नांदेडशी बरोबरी

मुंबई: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी दिली आहे. त्यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवारांच्या नावावर बुधवारी रात्री शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यांच्या नावाची कोणतीही अधिकृत पक्षाकडून करण्यात आली नाही. सुनेत्रा पवारांनी गुरुवारी विधान भवनात जाऊन अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे यावेळी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिंदेसेनेचा एकही नेता हजर नव्हता.

विरोधकांकडून कोणीही अर्ज न भरल्यानं सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे आता संसदेत बारामतीमधील तीन खासदार दिसतील. लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून गेल्या. त्यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला होता. आता सुनेत्रा पवारही संसदेत दिसणार आहेत. शरद पवारदेखील राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे बारामतीला तीन खासदार मिळाले आहेत. याशिवाय बारामतीचे दोन आमदार विधानसभेत आहेत. अजित पवार आणि रोहित पवार दोघेही विधानसभेचे आमदार आहेत. अजित पवार बारामतीचं, तर रोहित पवार कर्जत जामखेडचं प्रतिनिधीत्व करतात. विशेष म्हणजे हे सगळे आमदार, खासदार एकाच कुटुंबातील आहेत.
भाजप दादांची साथ सोडण्याच्या तयारीत? क्रोनोलॉजी ‘ऑर्गनाईज्ड’; फक्त ‘मेसेज’चं टेन्शन
तीन खासदारांमुळे बारामती मतदारसंघानं नांदेड मतदारसंघाशी बरोबरी केली आहे. नांदेडचे तीन खासदार सध्या संसदेत आहेत. लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले. लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांना भाजपनं राज्यसभेवर पाठवलं. याशिवाय भाजपनं अजित गोपछेडे यांनादेखील राज्यसभेवर संधी दिली. त्यामुळे नांदेडचे एकूण तीन खासदार संसदेत गेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी?
प्रफुल पटेलांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीतून अनेक जण इच्छुक होते. छगन भुजबळ, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकींना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती. पण त्यांना डावलून अवघ्या १० दिवसांपूर्वी लोकसभेत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांना संधी देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीत काहीशी नाराजी आहे. भुजबळांसह काही आमदारांनी अजित पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नाराजी बोलूनही दाखवली होती. लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराला संसदेत मागच्या दारानं प्रवेश का दिला जातोय, असा सवाल भुजबळांनी विचारला होता.