कलिंगड खरेदी करताना या ‘पाच’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे आरोग्य येऊ शकते धोक्यात!

Things to Check While Buying Watermelon in summer seasonImage Credit source: tv9 marathi

उन्हाळा आला की बाजारात कलिंगडांची रेलचेल दिसते. उन्हाच्या झळा थोपवण्यासाठी आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवण्यासाठी अनेक जण कलिंगड खाणं पसंत करतात. पण तुम्ही घेत असलेलं कलिंगड खरंच नैसर्गिक आहे का? की रसायनांनी भरलेलं? योग्य माहिती नसेल, तर स्वादासाठी खाल्लेलं कलिंगड आरोग्यावर घातक ठरू शकतं!

उन्हाळ्यात कलिंगड का खातात?

उन्हाळ्यात ताजंतवानं राहण्यासाठी कलिंगड हा उत्तम पर्याय आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारची कलिंगडं दिसत आहेत. पण याचबरोबर काही धोकादायक आजारांचं प्रमाणही वाढतंय, ज्यात कर्करोगाचाही समावेश आहे. काही कलिंगडांमध्ये रसायनांचा वापर केला जातोय. त्यामुळे कलिंगड खरेदी करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचं संपूर्ण कुटुंब आजारी पडू शकतं.

बनावट कलिंगड कसे ओळखावे

कलिंगडाचा गर खूपच लाल आणि चमकदार दिसत असेल, तर ते बनावट असण्याची शक्यता आहे. कापताना त्यातून फेस निघत असेल, तर ते अजिबात खाऊ नका. रसायनयुक्त कलिंगडाची चव थोडी वेगळी आणि काहीशी कृत्रिम वाटू शकते. तसेच, साल खूप चमकदार किंवा अस्वाभाविकरीत्या गुळगुळीत दिसत असेल, तर ते खरेदी करणं टाळा. बाजारात अशा बनावट कलिंगडांमुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.

अस्सल कलिंगड कसं निवडावं?

कलिंगड खाण्यापूर्वी ते थंड पाण्यात 30 मिनिटं भिजत ठेवा. खूप लालसर चमकणारं कलिंगड घेऊ नका. बाजारात उघड्यावर कापलेलं कलिंगड खरेदी करणं टाळा, कारण त्यात जिवाणू असण्याची शक्यता असते. घरी कापताना त्यातून फेस किंवा रसायनाचा वास येत नाही ना, याची खात्री करा. हे छोटे उपाय तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतात.

कलिंगडामुळे कोणते आजार होतात?

बाजारातील काही कलिंगडं लवकर पिकावीत म्हणून इथर, कार्बाइड किंवा रंग यांसारख्या रसायनांचा वापर केला जातो. ही रसायनं शरीरात गेल्यास कर्करोग, यकृताचं नुकसान, मूत्रपिंडाच्या समस्या आणि हार्मोनल असंतुलन होऊ शकतं. काही विक्रेते गराला जास्त लाल दाखवण्यासाठी कृत्रिम रंग मिसळतात. हे रंग जर खाद्यप्रमाणित नसतील, तर ते कर्करोगाला आमंत्रण देऊ शकतात. शिवाय, कलिंगड जास्त काळ साठवून ठेवलं किंवा नीट स्टोअर केलं नाही, तर त्यात बुरशी वाढते. ही बुरशी ‘अॅफ्लाटॉक्सिन’ नावाचं विष तयार करते, ज्यामुळे यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)