Pune Crime: दारूचे पैसे संपले, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर रॉड हल्ला, तिघे जखमी, एक ब्रेन डेड
प्रतिनिधी, पुणे : औंध येथील परिहार चौकात ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या; तसेच कामावर चाललेल्या नागरिकांना तिघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली आहे. चौघे आरोपी रात्रभर मद्यपान करीत होते. त्यामध्ये पैसे संपल्यावर पहाटे पुन्हा मद्यप्राशन करण्यासाठी त्यांनी लूटमार करण्यास सुरुवात केली. हातात लोखंडी रॉड घेऊन आरोपी परिहार चौकात नागरिकांना अडवून लूटमार करीत होते, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले.

नक्की काय घडले?

परिहार चौकात व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना अडवून लुटण्याच्या उद्देशाने चौघे आरोपी दुचाकीवरून फिरत होते. सर्वप्रथम या आरोपींनी पहाटे सव्वापाचच्या सुमारास ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या समीर रॉय चौधरी यांना अडवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. चौधरी यांनी नकार देताच मुलांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून पळ काढला. त्यामध्ये चौधरी गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी श्रेयस शेट्टी यांना परिहार चौकातील पूर्वी मोबाइल शॉपीसमोर रोखले. कामावर निघालेल्या श्रेयस शेट्टी यांच्या सायकलपुढे आरोपींनी त्यांची गाडी आडवी घातली. ‘चल पैसे निकाल’ असे म्हणून आरोपींनी शेट्टी यांच्या पँटच्या खिशात हात घातला. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी शेट्टी यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यामध्ये शेट्टी यांच्या डाव्या हाताला रॉड लागल्याने गंभीर दुखापत झाली.
Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंच्या वाढदिवशी मनसे कार्यकर्त्यांचा जल्लोष, शिवतीर्थाबाहेर केक कापला

जीव वाचविण्यासाठी शेट्टी पळू लागले असता, हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर हल्लेखोरांनी मंगलम कन्स्ट्रक्शन येथे रामसोबित कुमारलाही बेदम मारहाम केली. शेट्टी यांनी आरडाओरडा केल्यावर नागरिक जमा झाल्याने दोन हल्लेखोर दुचाकीवरून, तर दोघे रिक्षातून पसार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

रुग्णालयात ‘ब्रेन डेड’ घोषित

समीर रॉय चौधरी हे भारतीय आयुर्विमा महामंडळातून (एलआयसी) निवृत्त झाले आहेत. लुटारूंनी रॉडने बेदम मारहाण केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. पावणेसहाच्या सुमारास एका पेपर विक्रेत्याने त्यांना जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले पाहिले. त्याने तातडीने चौधरी यांच्या कुटुंबाला माहिती दिली. त्यानंतर चौधरी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे ते ‘ब्रेन डेड’ झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.