भारतासह संपूर्ण जगात विवाहबाह्य गर्भधारणेचे प्रमाण विशेषतः किशोरवयात गर्भवती होणाऱ्या अविवाहित महिलांची वेगाने वाढत असलेली संख्या चिंता वाढवणारी ठरली आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या अभ्यासातून या समस्येची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे खाजगी रुग्णालयातील आकडेवारीचा अंतर्भाव यात नसल्याने ही समस्या आणखीनच गंभीर असल्याचे म्हटले जात आहे…
शासकीय मेडिकल रुग्णालयातील जानेवारी २०२३ ते २०२४ या काळातील प्रकरणे अभ्यासण्यात आली होती. या प्रकरणात १२४ पैकी ६७ मुली या अल्पवयीन असल्याची माहीती उघडकीस आली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरात अविवाहित मुली-महिलांमध्ये गर्भवती होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून सामोर आला आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी हा अभ्यास केला आहे. 124 प्रकरणांपैकी 67 मुली अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे.
एका राष्ट्रीय परिषदेत डॉ. अविनाश गावंडे यांनी या अभ्यासाचे निष्कर्ष सादर केले आहेत. अभ्यासातील हा निष्कर्ष समाजाची चिंता वाढविणारा आहे.
शासकीय मेडिकल रुग्णालयातील जानेवारी 2023 ते जून 2024 याकालावधीतील प्रकरणे या संशोधनासाठी निवडण्यात आली होती. या अहवालानुसार 124 पैकी 67 गर्भधारणा या 18 वर्षाखालील वयोगटातील होत्या. 18 ते 21 वयोगटात 30, 22 ते 25 वयोगटात 21 आणि 25 वर्षांवरील अविवाहित गर्भधारणेची 6 प्रकरणे आढळून आली आहेत.
* गर्भधारणा झाल्यानंतर 33 टक्के महिलांनी गर्भपाताचा निर्णय घेतला तर 48 टक्के महिला या प्रसूतीपर्यंत पोहोचल्या.
* ज्यांची गर्भधारणा 24 आठवड्यांपेक्षा कमी होती अशा महिलांनी अधिक प्रमाणात गर्भपाताचा पर्याय निवडला,
* 24 आठवड्यानंतरच्या प्रकरणांमध्ये 48 टक्के महिला प्रसूतीपर्यंत पोहोचल्या.
* या अभ्यासात 6 अपूर्ण गर्भपात, 5 घरगुती प्रसूती तर 4 रुग्ण उपचार सोडून पसार झाले, यात 3 ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची प्रकरणेही नमूद केली आहेत.
अविवाहित मातांसाठी विशेष पुनर्वसन योजना
भारतासारख्या विकसनशील देशात अविवाहित गर्धारणा ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक, कौटुंबिक आणि आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या आहे. बदनामीच्या भीतीने अनेक महिला वेळेवर उपचार घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. अविवाहित मातांसाठी विशेष पुनर्वसन योजना, जनजागृती मोहीम अणि सर्वात महत्वाचे म्हणजे किशोरवयीन लैंगिक शिक्षण अत्यावश्यक असल्याचे या निमित्ताने उघडकीस आले आहे असे नागपूर मेडिकल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले.