कसाबला फाशीवर लटकवण्यात मोठा रोल; कोण आहेत देवेन भारती?

Mumbai Police Commissioner: वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे अतिरिक्त महासंचालक या श्रेणीतील अधिकारी आहेत आता त्यांची नियुक्ती करताना मुंबई पोलीस आयुक्त हे महासंचालक श्रेणीतील पद अतिरिक्त महासंचालक श्रेणीत आणण्यात आलेलं आहे. देवेन भारती हे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा 5.30 वाजता पदभार स्वीकारणार आहेत. सांगायचं झालं तर, देवेन भारती यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

यापूर्वी देवेन भारती हे मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त होते. देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकारने पहिल्यांदाच मुंबई पोलिस आयुक्तपदाची विशेष नियुक्ती केली.

आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी यापूर्वी मुंबईत सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), सहपोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं आहे. ते महाराष्ट्र एटीएसचे प्रमुखही राहिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली महत्त्वाची जबाबदारी

2014 ते 2019 या काळात, जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा भारती यांना अनेक महत्त्वाच्या पदांची कमान देण्यात आली होती. फडणवीस सरकारने सुरुवातीला त्यांची नियुक्ती संयुक्त पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून केली. त्यानंतर देवेन भारती यांना अतिरिक्त डीजीपी म्हणून बढती देण्यात आली आणि त्यांना दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख बनवण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेन भारती यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षेचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. अशात, शिंदे-फडणवीस सरकारनं 13 डिसेंबर रोजी देवेन भारती यांच्या जागी सहआयुक्त राजवर्धन यांची नियुक्ती केली.

हाय – प्रोफाईल प्रकरणांचा केलाय तपास

देवेन भारती यांनी मुंबईतील काही हाय-प्रोफाइल प्रकरणांचा कसून तपास केला आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आणि ज्येष्ठ पत्रकार जे डे यांच्या हत्येच्या तपासात देखील देवेन भारती यांचा सहभाग होता. 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने देवेन भारती यांच्यावर सोपवली होती .

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)