‘शरद पवार गटात माझ्यावर अन्याय…’, 35 वर्षांपासून सोबत असणाऱ्या बड्या नेत्याचा आरोप, अजित पवार गटात दाखल होणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांना पुन्हा धक्का बसणार आहे. 35 वर्षांपासून शरद पवार यांच्या सोबत असणारे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील पक्ष सोडणार आहेत. शरद पवार यांच्या गटात आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत सतीश पाटील पक्ष सोडणार आहे. ते लवकरच अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील पक्षाला रामराम ठोकत अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. लवकरच मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. पारोळा -एरंडोल मतदारसंघातून डॉ.सतीश पाटील यांनी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु ते पराभूत झाले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी डॉ. सतीश पाटील यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला दुजोरा दिला आहे. डॉ. सतीश पाटील यांची आज त्यांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहे. या बैठकीत प्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार असल्याची सतीश पाटील यांनी सांगितले. सतीश पाटील यांच्या पक्ष सोडण्यामुळे जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाला चांगलाच फटका बसणार आहे.

सतीश पाटील काय म्हणाले होते…

गेल्या 35 वर्षांपासून मी शरद पवारांचा पाईक असून निष्ठावान आहे. पण पक्षात माझ्यावर अन्याय होत असेल आणि कार्यकर्त्यांच्या काही वेगळ्या भूमिका असतील तर मला त्यांच्यासोबत जावे लागेल, असे त्यावेळी डॉ. सतीश पाटील यांनी म्हटले होते.

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मागील आठवड्यात पुण्यात मागील आठवड्यात साखर उद्योगात कृत्रिम बुद्धिमतासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापरावर बैठक झाली होती. या बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात २० ते २५ मिनिटे चर्चा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सतीश पाटील शरद पवार यांची साथ सोडत असल्यामुळे एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)