मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या इमारतीत भीषण आग

मुंबईतील वांद्रे परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूमच्या इमारतीत मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर परिसरात पोहचला आहे. आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त अद्याप नाही.

मंगळवारी पहाटे वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोडवरील एका बहुमजली इमारतीत आग लागली. वांद्रे येथे असलेल्या लिंक स्केअर मालमधील क्रोमा शोरुमला ही आग लागली. बेसमेंटमध्ये ही आग लागल्यानंतर ती तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली आहे. आगीमुळे या भागातील रस्ते बंद करण्यात आले आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस पथक आणि अग्निशमन दलाच्या २५ गाड्या आणि इतर अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. रोबोटीक मशीन आणली गेली आहे. ज्या ठिकाणी अग्नीशमन दल पोहचू शकत नाही, त्याठिकाणी रोबोटीक मशीन वापरल्या जात आहेत.

वांद्रे भागातील लिंकिंग परिसरात ही आग लागली. आग सकाळी चार वाजता लागली तेव्हा पोलीस किंवा अग्नीशमन दलाचे अधिकारी आले नसल्याचा आरोप मॉलचे मालक सिद्दीकी  यांनी केला आहे. ते म्हणाले की, सकाळी सहा वाजता आग विझवण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे आग वाढली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिलेंडर होते. त्या सिलेंडरला काही झाले असते तर संपूर्ण लिकींग रोड परिसरात आग पसरली असती, असे सिद्दीकी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.

दोन दिवसांत दुसरी आग

गेल्या दोन दिवसांत मुंबईत पहाटे लागलेली ही दुसरी मोठी आग आहे. रविवारी बॅलार्ड इस्टेट परिसरातील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालय असलेल्या इमारतीत भीषण आग लागली होती. त्यात अनेक कागदपत्रे जळाली आहे. परंतु ही सर्व कागदपत्रे डिजिटलाज करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेटमधील कैसर-ए-हिंद इमारतीला पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)