‘त्या’ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार नाही…, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावे, असे म्हटले आहे, ते महाराष्ट्रात असणारे सर्व नागरिक सापडले आहेत. पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजे, त्या सर्वांना सांगितले गेले आहे. त्याचे ट्रॅकींग केले जात आहे. कोणीही पाकिस्तानी नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडला नाही. त्याची आकडेवारी लवकरच तुम्हाला दिला जाईल. परंतु सिंधी समाजाचे लोक दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहे. त्यामुळे त्यांना भारत सोडण्याचे कारण नाही. जे पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर आले आहे, त्यांना देश सोडावे लागणार आहे. त्या लोकांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. धर्म विचारुन दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली नाही, असे वडेट्टीवार म्हणाले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, देशभरातील मृत पर्यटकांच्या नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. जे नातेवाईक त्या ठिकाणावरची परिस्थिती सांगत आहे त्यांना खोटे ठरवले जात आहे. हे खूप वाईट आहे. याला मुर्खपणा म्हणावा की अन्य काही, हे सांगण्यास माझ्याकडे शब्द नाही. त्यांना मृत्यूमुखी पडलेल्या लोकाबद्दल संवेदना नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

बुलेट ट्रेनच्या कामाबद्दल बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अडीच वर्ष बुलेट ट्रेनचे काम बंद पाडले होते. त्यामुळे आपण अडीच वर्ष मागे गेलो. या दरम्यान गुजरात बुलेट ट्रेनच्या कामात खूप पुढे निघून गेला. आमचे सरकार आल्यानंतर हे काम आम्ही पुढे नेले. आता खूप चांगले काम झाले आहे. २०२८ पर्यंत बुलेट ट्रेनचे काम पूर्ण होईल.

ईडी इमारतीस लागलेल्या आगीत प्रत्येक पेपर सुरक्षित आहे. या आगीमुळे कोणत्याही कागदाला धक्का लागला नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)