उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की घरात मुलांचा गोंगाट आणि धमाल वाढलेली असते. बागेत खेळणं, सायकलवर फिरणं, मित्रांसोबत मजा करणे — या दिवसांची मजा वेगळीच असते. पण उन्हाळ्यासोबतच मुलांच्या आरोग्यावर धोका निर्माण करणारे काही आजारही येतात, ज्याकडे पालकांनी वेळीच लक्ष दिलं पाहिजे.
उन्हाळ्यात बदललेलं हवामान, अस्वच्छ खाणं-पिणं आणि सततच्या उष्णतेचा त्रास यामुळे लहान मुलं सहज आजारी पडतात. पण थोडीशी काळजी घेतली तर ही समस्या टाळणं शक्य आहे.
चला, पाहूया उन्हाळ्यात मुलांना त्रास देणारे ३ मोठे आजार आणि त्यावर सोप्पे उपाय:
1. उष्माघात (Heat Stroke) : उन्हाळ्यात उन्हात खेळताना मुलांचं शरीर जास्त तापतं आणि तेवढ्या प्रमाणात पाणी न घेतल्यास उष्माघाताचा धोका वाढतो. यामुळे थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे अशी लक्षणं दिसतात.
काय कराल?
1. दुपारी १२ ते ४ या वेळेत मुलांना बाहेर जाऊ देऊ नका.
2. मुलांना बाहेर जाताना टोपी घालून आणि सनस्क्रीन लावून जायला सांगा.
3. कोल्ड्रिंक्स ऐवजी पाणी, ताक, लिंबूपाणी यासारखे नैसर्गीक थंड पेय पुरेसे प्यायला द्या.
2. जुलाब आणि इन्फेक्शन : उन्हाळ्यात बाहेर मिळणारे फास्ट फूड, सरबतं, बर्फाचे गोळे यामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका वाढतो. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या आणि पोटदुखी सुरू होऊ शकते.
काय कराल?
1. मुलांना घरचं ताजं आणि स्वच्छ अन्न द्या.
2. उकळून थंड केलेलं किंवा फिल्टर केलेलं पाणी प्यायला द्या.
3. जेवणापूर्वी आणि नंतर हात धुण्याची सवय लावा.
3. टायफॉइड : टायफॉइड हा उन्हाळ्यात पाण्याद्वारे पसरणारा गंभीर आजार आहे. दूषित अन्न आणि पाण्यामुळे याचा संसर्ग होतो.
काय कराल?
1. थंड पाण्या ऐवजी मुलांना फक्त स्वच्छ आणि उकळलेलं पाणीच प्यायला द्या.
2. बाहेरचं junk food टाळा.
3. ताप तीन दिवसांपेक्षा जास्त टिकल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पालकांनी स्वच्छतेच्या सवयी, शिस्तबद्ध खाण्यापिण्याची काळजी आणि भरपूर पाणी पिण्याची आठवण मुलांना सतत करून दिल्यास या आजारांपासून सहज बचाव करता येतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)