‘हे काय मनमोहन सिंग यांच सरकार नाही….’ पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणेंचा काँग्रेसला खोचक टोला

मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे, तसेच दोन परदेशी नागरिकांना देखील दहशतवाद्यांनी मारलं आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे. मोदी सरकारनं पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. सिंधु पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, अटारी बॉर्डर बंद करण्यात आली असून, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचलं आहे.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे? 

2014 नंतर दहशतवाद असो किंवा पाकिस्तानच्या कुरापती, आपल्या देशाची प्रतिमा कणखर राहिलेली आहे. हे काय मनमोहन सिंग यांचं सरकार नाही. गांधी परिवाराचं केंद्र सरकार नाही. मोदीजींचं केंद्र सरकार आहे. 2014 नंतर ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघितलं त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. पाकिस्तानला मोदीजी असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा आबा पण आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मोदीजींवर विश्वास ठेवला पाहिजे, हे काय मनमोहन सिंगांचे किंवा लिचे-पिचे सरकार नाहीये, हे कणखर देशभक्तांचं, राष्ट्रभक्तांचं सरकार आहे.  त्यामुळे पाकिस्तान परत आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील करणार नाही, असं  देखील नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  शेंबड्या लोकांना तुम्ही देशाचे प्रश्न विचारता भांडूपच्या देवानंदला देशपातळीचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचारल्यावर अशीच उत्तर मिळणार, त्यांचे मालक ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी कोरोना काळात महाराष्ट्र एक नंबरला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता का? त्यामुळे कुठल्या तोंडाने अमित शहा यांचा राजीनामा मागत आहेत, असा हल्लाबोल राणे यांनी केला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)