दुपारी जेव्हा आपण पोटभर जेवण करतो तेव्हा आळस आणि सुस्ती आपल्याला घेरते. त्यावेळेस शरीराला थोडीशी आरामाची आवश्यकता असते आणि मन सुस्त होऊ लागते. विशेषतः तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा घरी काम करत असाल तेव्हा जेवणानंतर तुम्हाला काम करण्याची इच्छा होत नाही आणि तुमचे शरीर जड वाटू लागते. हा आळस फक्त अन्न खाल्ल्याने होत नाही, तर तुम्ही काय खाल्ले आहे, किती खाल्ले आहे आणि खाल्ल्यानंतर तुमच्या सवयी काय आहेत यावरही ते अवलंबून असते.
मात्र अशावेळेस अनेकजण चहा किंवा कॉफीचे सर्वाधिक सेवन करतात. पण प्रत्येक वेळी येणारा आळस टाळण्यासाठी गरजेचे नाही की तुम्ही चहा आणि कॉफीचे सेवन केलेच पाहिजे. तर यापासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या आणि निरोगी सवयींचा अवलंब करून तुम्ही दुपारची झोप आणि आळस पूर्णपणे दूर करू शकता. जेवणानंतर येणारा आळस दूर करण्यासाठी आपण आजच्या या लेखात या सोप्या आणि प्रभावी पद्धती जाणून घेऊयात.
हलके आणि संतुलित जेवण घ्या
जास्त जड, तेलकट आणि मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीर सुस्त होते. त्यामुळे आपल्या दुपारच्या जेवणानंतर आळस येतो. तर हाच आळस टाळण्यासाठी तुम्ही दुपारच्या जेवणात डाळी, भाजी-पोळी, थोडे सॅलड आणि दही असे हलके आणि पचणारे अन्न खाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पोट हलके राहील.
जेवल्यानंतर लगेच झोपू नका
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पचनक्रिया मंदावते आणि शरीर आणखी सुस्त होते. जेवल्यानंतर काही मिनिटे फिरा. यामुळे अन्न चांगले पचते आणि शरीर सक्रिय राहते. यामुळे आळसही दुर होतो.
थोडावेळ बाहेर जा किंवा ताजी हवा घ्या
जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल दुपारच्या जेवणानंतर खूप आळस येत असेल तर अशावेळेस ऑफिसची खिडकी उघडा किंवा ऑफिसच्या इमारतीच्या बाहेर फेरफटका मारा. ताजी हवा आणि सौम्य सूर्यप्रकाश मनाला ताजेतवाने करतो आणि झोप दूर ठेवतो. जर तुम्ही घरी असाल तर बाल्कनीत किंवा घराच्या आत काही वेळ फेरफटका मारा.
पाणी प्या
बऱ्याचदा डिहायड्रेशनमुळे एखाद्याला थकवा जाणवतो आणि काहीही करण्याची इच्छा होत नाही. अशा परिस्थितीत जेवणानंतर काही वेळाने पाणी प्यायल्याने शरीराला ताजेतवाने वाटते आणि आळस कमी होतो.
स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम
एकाच ठिकाणी आठ तास करणाऱ्या म्हणजेच डेस्क जॉब करणाऱ्यांसाठी स्ट्रेचिंग खूप महत्वाचे आहे. दुपारच्या जेवणानंतर तुम्ही तुमची मान, खांदे आणि पाठ हलके स्ट्रेचिंग करून तुमचे शरीर सतर्क ठेवू शकता. म्हणून, जेव्हाही तुम्ही दुपारचे जेवण कराल तेव्हा स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करा जेणेकरून शरीर सक्रिय राहील आणि तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकाल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)