Weather Update : घामाच्या धारा, चढणार पारा, मराठवाड्यासह विदर्भावर सूर्य आग ओकणार, एप्रिलच्या या तारखेला काळजी घ्या

राज्यात उष्णतेचा प्रकोप वाढणार आहे. अनेक जिल्ह्यांवर सूर्य आग ओकणार आहे. उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला. उष्णतेच्या लाटेने अंगाची लाही लाही होणार आहे. चंद्रपूरमध्ये पाऱ्याचे काटे मोडतात की काय, अशी अवस्था आहे. चंद्रपूरमध्ये तापमान ४५.८ अंश सेल्सिअसवर पोहचले. तर त्या पाठोपाठ विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि ब्रह्मपूरी या शहरांमध्ये तापमानाने ४५ अंशांपर्यंत मजल मारली. या काळात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भासह मराठवाड्याला अलर्ट

पश्चिम विदर्भासह पूर्व भागातील अनेक शहरांमध्ये पारा वाढणार आहे. उष्णतेच्या झळांनी नागरिक बेजार होतील. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात उष्ण वातावरण असेल. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीतील नागरिकांना सुद्धा उष्ण लाटेचा सामना करावा लागणार आहे.

पुणेकरांचा ताप वाढला

पुण्यात तापमानाने १२८ वर्षांचा विक्रम मोडला आहे. पुण्यात बुधवारी म्हणजेच २३ एप्रिलला ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली.यापूर्वी ३० एप्रिल १८९७ रोजी ४३.३ तापमानाची नोंद झाली होती. १२८ वर्षांनी काल तापमानाने विक्रम मोडला आहे.

या तारखांना घ्या काळजी

हवामान विभागाने आजपासून ते 29 एप्रिलपर्यत देशातील अनेक भागांना उष्णतेच्या झळा बसतील. पश्चिमी मध्य प्रदेशातील अनेक भागाना उन्हाचा तडाखा बसेल. २३ ते २६ एप्रिल दरम्यान उत्तर प्रदेश, विदर्भ, बिहार, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमधील गंगा मैदानी क्षेत्रात उष्णतेच्या लाटेच्या अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर २४ आणि २५ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक शहरांमधये तापमानाने कहर केला. उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच दुपारी बाहेर पडावे अन्यथा त्यांनी बाहेर जाणे टाळावे, पाणी भरपूर प्यावे आणि डोक्यावर रुमाल बांधावा, पाण्याची बॉटल सोबत ठेवावी, असे आवाहन करण्यात आले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)