Nitesh Rane : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं प्रस्थ असलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हो दोन्ही चुलत भाऊ एकत्र येण्याबाबत चर्चा चालू झाली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर या चर्चेला धुमारे फुटले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र हे शक्य नाही, असं म्हटलंय. असे असतानाच आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याअगोदर उद्धव ठाकरे यांनी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी विचारणा केली होती का? असा उपहासात्मक प्रश्न विचारला आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
याबाबतचे सविस्तर पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या वृत्तानुसार नितेश राणे यांनी एका पॉडकास्टमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर भाष्य केलं. यावेळी बोलताना “मनसेसोबत हात मिळवण्याआधी उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्याशी विचारणा केली का? हे उद्धव ठाकरे यांना विचारलं पाहिजे. अशा प्रकारच्या निर्णयात रश्मी ठाकरे यांच्या सल्ल्याला फार महत्त्व आहे,” असे खोचक भाष्य राणे यांनी केले. तसेच राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी रश्मी ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फार टोकाचे मतभेद नव्हते, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांना रश्मी ठाकरे यांची परवानगी…
तसेच, राज ठाकरे यांची जास्त अडचण रश्मी ठाकरे यांनाच होती. पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करायची असेल तर उद्धव ठाकरे यांना रश्मी ठाकरे यांची परवानगी घ्यावी लागेल. शिवसेना पक्षाला जे आतून ओळखतात ते माझ्या या मताला नाकारणार नाहीत, असा दावाही नितेश राणे यांनी केला. तसेच भाजपाच्या नेतृत्त्वातील महायुतीने निवडणुकीत दमदार विजय मिळवला. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र आले तरी आमच्यावर काहीही परिणाम पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्यामुळे आता नितेश राणे यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष नेमकी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.